आत्माचा उपक्रम : तीन दिवस दिले प्रशिक्षण नगर प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कृषी विभाग व प्रकल्प संचालक तसेच व्ही. एस. टी. ट्रॅक्टर टिलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोनापूर येथे करण्यात आले. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दुरूस्तीबाबतचे धडे देण्यात आले. प्रशिक्षणाच्या शुभारंभ कार्यक्रमाला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक प्रीती हिरळकर, पवन माधवशेट्टीवार उपस्थित होते. अनेक शेतकरी आता ट्रॅक्टरसह आधुनिक साहित्यांचा वापर करू लागले आहेत. प्रत्यक्ष काम करताना काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास त्याची दुरूस्ती शेतकऱ्यांना करता यावी, या उद्देशाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान ट्रॅक्टरबरोबर इतरही साहित्याची थोडीफार दुरूस्ती कशी करावी, याचे धडे देण्यात आले. प्राथमिक स्वरूपाची जरी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली तर त्यांच्या कामाचा वेळ वाचेल, त्याचबरोबर वाहन किंवा साहित्य शहरात आणण्याचा खर्चही वाचण्यास मदत होणार आहे. याच उद्देशाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दुरूस्तीचे धडे
By admin | Published: May 06, 2017 1:16 AM