आष्टी : सार्वजनिक बांधकाम विभागाने चामोर्शी ते येनापूर या रस्त्याची दुरूस्ती न केल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. परिणामी आष्टीच्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. गेल्या दीड वर्षापासून याचा परिणाम त्यांच्या आर्थिक मिळकतीवर झाला आहे.चामोर्शी तालुक्यातील आष्टी हे अहेरी-चंद्रपूर मार्गावरील मुख्य ठिकाण आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारे स्थळ अशी आष्टीची ओळख आहे. गडचिरोली-आष्टी या मार्गावर आष्टी ते येनापूर हा १५ ते २० किमीचा रस्ता मागील वर्षी पावसाळ्यात पूर्णत: उखडला. त्यानंतर या मार्गावरची राज्य परिवहन महामंडळाची बस सेवाही बंद करण्यात आली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अनेक आंदोलने झालीत. त्यानंतर रस्त्याची थातूरमातूर दुरूस्ती करण्यात आली. मात्र गेल्या एक ते दीड वर्षापासून या मार्गावरून खासगी वाहने (काळी-पिवळी वगळता ) एकही जात नाही. गडचिरोलीवरून अहेरीकडे व आष्टीकडे जाणारे वाहन चामोर्शी, घोट, सुभाषग्राम मार्ग मार्र्कंडा कं. असे प्रवास करीत जातात. जवळजवळ ९ किमीचा अधिकचा फेरा पडला तरी याच मार्गाने नागरिक आपल्या खासगी वाहनांनी प्रवास करतात. यामुळे आष्टी गावाच्या व्यापार, उदिमावावर मोठा परिणाम झाला.आष्टीच्या स्थानिक बाबासाहेब आंबेडकर चौकात ४० ते ५० लहान-मोठे व्यावसायिक आहेत. कुणाचा हॉटेल आहे. कुणाची चहाटपरी आहे तर कुणाचे लहान-मोठे दुकान आहेत. गडचिरोलीकडून दररोज १०० वाहने चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी व अहेरी, आलापल्लीकडे जात होती. येथे नागरिक नास्त्यासाठी थांबत. परंतु आता आष्टीवरून वाहनच जात नाही. त्यामुळे या भागातला व्यवसाय प्रचंड प्रमाणात कमी झाला आहे. आष्टीतीतल अनेक दुकानदारांनी मार्र्कंडा कं. गावातील वनविभाग कार्यालयाच्या वळणावर कच्ची दुकाने थाटली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निधी मंजूर होऊन गेल्या दीड वर्षापासून चामोर्शी ते येनापूर या रस्त्याचे काम करीत नसल्याने आष्टीचे नागरिक प्रचंड नाराज आहे. या भागातील बेरोजगार लहान-मोठा व्यवसाय करून आपले कुटुंब चालवित होता. त्याच्याही व्यवसायावर रस्त्याच्या नादुरूस्तीमुळे फटका बसला आहे. हा रस्ता खराब होऊन दीड वर्ष झालेत मात्र दुरूस्तीचा अजुनही पत्ता नाही. पालकमंत्र्याचेही आश्वासन या कामाबाबत फोल ठरले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नादुरुस्त रस्त्यामुळे व्यापार थंडावला
By admin | Published: June 16, 2014 11:30 PM