लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आदिवासी समाज माेठ्या संख्येने वास्तव्यास आहे. निसर्गपूजक म्हणून या समाजाची ओळख आहे. काेणत्याही महत्त्वाच्या कार्याचा शुभारंभ पारंपरिक पूजाअर्चेने या समाजात केला जाताे. माेहफुलाच्या पूजेला या समाजात माेठे महत्त्व आहे. माेहफुलाची पूजा करून महत्त्वाच्या कार्याची सुरुवात केली जाते.
माडिया या आदिवासी जमातीतील बांधव एकत्र येेऊन माेहफुलाची पूजाअर्चा करतात. पूजा केल्याशिवाय माेहफुलाचा इतर ठिकाणी वापर केला जात नाही. माेहफुलाची पूजा करताना आदिवासी देवीदेवतांचा उद्घाेष केला जाताे. अशा प्रकारची सामूहिक पूजा आदिवासी बांधवांतर्फे गाेटूलमध्ये केली जाते.
तेरवी, नामकरण, धानाची पेरणी करताना व इतर महत्त्वाच्या कार्याच्या वेळी माेहफुलाची पूजा केली जाते. दुर्गम भागात आदिवासी बांधव दर रविवारी अशाप्रकारची पूजा करतात. माेहफुलाच्या पूजेची परंपरा आदिवासी समाजात अनेक वर्षांपासून जाेपासली जात आहे.