आॅनलाईन लोकमतगडचिरोली : विदर्भातील झाडीपट्टी म्हणून गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. दीपावलीनंतर दरवर्षी झाडीपट्टी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंडई भरविली जाते. तसेच रात्रीच्या सुमारास मनोरंजन म्हणून झाडीपट्टीच्या नाट्यप्रयोगांचे आयोजन केले जाते. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा प्रकोप वाढला असला तरी दिवसा सायंकाळपर्यंत भरणाऱ्या मंडईला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवाय रात्री होणारे नाट्यप्रयोग बघण्यासाठी नाट्यरसिकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण लोकांनी मंडईच्या माध्यमातून गेल्या १०० वर्षांची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा कायम राखली आहे. दिवसा भरणाऱ्या मंडईमध्ये सभोवतालच्या आठ ते दहा गावातील महिला, पुरूष, युवक, युवती, शाळकरी मुले सहभागी होत आहेत. रात्रीच्या सुमारास झाडीपट्टी रंगभुमीचे नाट्यप्रयोग तसेच काही गावांमध्ये सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमही होत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, कोरची आदी तालुक्यांमध्ये मंडई व झाडीपट्टीच्या नाट्यप्रयोगांची रेलचेल प्रचंड वाढली आहे. अशा प्रकारची मंडई भरविणारे तसेच नाट्य प्रयोगांच आयोजन करणारे अनेक मंडळ गावागावात निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षापासून मंडई व नाट्य प्रयोग आयोजनाच्या कामात युवकांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे. मंडईतून नातेसंबंध दृढ होत आहेत.
बोचऱ्या थंडीतही गडचिरोलीतील मंडईला जोरदार प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:05 AM
गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा प्रकोप वाढला असला तरी दिवसा सायंकाळपर्यंत भरणाऱ्या मंडईला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ठळक मुद्दे शेकडो वर्षांपासून सामाजिक व सांस्कृतिक परंपरा कायम