एटापल्ली : खासगी वाहने बसच्या आधी पाच मिनिटे सोडली जातात. त्यामुळे संपूर्ण प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यांच्या मागे बस जात असल्याने बसला प्रवासी मिळत नाहीत. परिणामी बसला तोट्याचा सामना करावा लागत आहे. अनेक दुर्गम गावांमध्ये बससेवा पोहोचली नाही.
टिल्लू पंपाचा वापर सर्रास
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्यावतीने दिवसातून दोनदा नळ पाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र गडचिरोली शहरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळते.
इमारतीलगतच्या रोहित्रांचा धोका वाढला
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प थंडबस्त्यात
अहेरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात.
चपराळा पर्यटनस्थळी सुविधांचा अभाव
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम, चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.
रस्ते खड्डेमय
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे रस्ते दुरूस्त करावेत त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे.
मुख्यालय सक्तीचे करा
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहातच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत.
रांगीमार्गे अवैध वाहतूक
चातगाव : चातगाव रांगीमार्गे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. खासगी वाहनाने वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू करण्याची आवश्यकता आहे.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे लक्ष दिले जात नसल्याने नाराजी आहे.
कव्हरेजची समस्या
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात माेबाईल टाॅवर नसल्याने कव्हरेजची समस्या आहे. लाेकांकडे असलेले ॲन्ड्राॅईड माेबाईल इंटरनेटवरील कामाशिवाय कुचकामी ठरत आहे. त्यामुळे गुड्डीगुडम येथे टाॅवरची निर्मिती करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
विहिरीवर खासगी पंप
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाहीत. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशाप्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
डेपोअभावी नागरिक त्रस्त
कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही. त्यामुळे लाकूड डेपाे निर्माण करण्याची गरज आहे.
बाजारात ओटे निर्माण करा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी हे परिसरातील मोठे गाव असून, येथे दर शुक्रवारला आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्याची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांना त्रास होत आहे. त्यामुळे ओटे बांधावेत.
कार्यालये अस्वच्छ
गडचिरोली : शहरातील अनेक कार्यालयांच्या इमारतींच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे़. मागच्या बाजूने कच्चा रस्ता असून, त्यावर घाण, कचरा साठून असतो़, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे़. विशेष करून शासकीय इमारतीच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात घाण पसरली असल्याचे चित्र दिसून येते.
हेमाडपंथी मंदिर जीर्ण
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते, अशी अख्यायिका आहे.