लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरात मंगळवारी संध्याकाळपर्यंत आणि काही भागात बुधवारीही बरसलेल्या पावसाने अनेक भागातील मार्ग अडून वाहतूक ठप्प पडली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ही स्थिती कायम होती. दरम्यान अनेक भागात पावसाने उसंत घेतल्याने गुरूवारी सकाळपर्यंत अडलेले बहुतांश मार्ग पूर्ववत सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.बुधवारी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील १२ तालुक्यांत २४ तासात सरासरी ९५.७ मिमी पाऊस झाला. त्यात सर्वाधिक १६०.८ मिमी पाऊस एटापल्ली तालुक्यात झाला आहे. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची आणि एटापल्ली या ९ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यासोबतच गोसेखुर्द व इतर काही जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्या फुगल्या आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागातून वाहणाऱ्या मोठ्या नद्यांसह छोट्या नद्या व नाले दुथडी भरून वाहात आहेत. अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पुलांवरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प पडली.बुधवारी दिवसभर आष्टी-गोंडपिपरी (वैनगंगा नदी), डुम्मी-जवेली (डुम्मी नाला), आलापल्ली-भामरागड (पर्लकोटा नदी), कुरखेडा-वैरागड (सती नदी), मानापूर-पिसेवडधा (खोब्रागडी नदी), आरमोरी-वैरागड-रांगी (खोब्रागडी नदी), फरी-अरततोंडी (गोदावरी नदी), विश्रामपूर-उसेगाव (कठाणी नदी), तळोधी-आमगाव (पोहार नदी), कुरखेडा-कोरची (लेंढारी नाला), वसा-नैनपूर (आंधळी नाला) आदी मार्ग बंद होते. सायंकाळीही त्या मार्गावरील वाहतूक बंदच होती.सकाळी गडचिरोली-धानोरा (रांगी नाला), गडचिरोली-चामोर्शी (शिवणी नाला), खरपुंडी-दिभना (कठाणी नदी), मुरखडा-मुडझा-वाकडी (नाला), गडचिरोली-कारवाफा (नाला), मौशीखांब-वडधा, शंकरपूर-कोरेगाव, चिखली-अंधार, वडसा-पिंपळगाव आदी मार्गांसह गडचिरोली-आरमोरी (पाल नदी) मार्ग बंद झाला होता. मात्र संध्याकाळपर्यंत हे मार्ग वाहतुकीसाठी मोकळे झाले.जिल्ह्यात १ जून पासून आतापर्यंत सरासरी ८९८.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे ११२७.६ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाची टक्केवारी १२५.४८ एवढी आहे.सोमवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने उसंत न घेतल्यामुळे मंगळवारी व बुधवारी खोब्रागडी, वैलोचना व सती नदीला पूर आला असून लगतची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. परिणामी धानपिकाची नासाडी झाली आहे.पावसामुळे काही घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. वैरागड-देलनवाडी-मानापूर-कोसरी-अंगारा, कढोली-वैरागड व कढोली-उराडी हे मार्ग गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे.भामरागड अजूनही संपर्काबाहेरभामरागड-कोठी मार्गावर कारमपल्ली नाल्याला पूर आल्यामुळे येथील कर्मचारी नावेच्या सहाय्याने नाला पार करून जात आहेत. टिनाचा डोंगा तयार करून त्याच्या सहाय्याने पाण्यातून आवागमन केले जात आहे. अशाप्रकारच्या डोंग्याचा वापर मासेमार करीत असतात. त्यांना तसी सवय आहे. परंतु कर्तव्य बजाविण्यासाठी कर्मचाऱ्यांनीही अशाप्रकारचा उपाय शोधून कॅनला टिन बांधून डोंगा तयार केला आहे. तसेच सदर मार्गावरील कट्टी नाल्यावरही भरपूर पाणी आहे. कोठी पोलीस स्टेशन जवळचा नालाही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे कोठी, नारगुंडा परिसरातील अनेक गावांचा भामरागड तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.गेल्या दोन दिवसात भामरागड भागात पाऊस कमी असला तरी पर्लकोटा नदीच्या वरच्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री पुन्हा एकदा पर्लकोटावरील पुलावर पाणी चढून भामरागडचा संपर्क तुटला आहे. गेल्या २० दिवसात भामरागडचा संपर्क तुटण्याची ही चौथी वेळ आहे.अन् मध्यरात्री ‘ती’ कार पुरातून काढली बाहेरगडचिरोली ते पोर्ला मार्गावर गडचिरोलीपासून ६ किलोमीटरवर असलेल्या पाल नदीला आलेल्या पुराचे पाणी मंगळवारी रात्री पुलावर चढले. दरम्यान एक व्यक्ती आपल्या कारमधून पाळीव श्वानासह गडचिरोलीच्या दिशेने येत होते. पण पुलावरील पाण्यामुळे त्यांची कार बंद पडली. नदीच्या पलीकडील बाजूच्या एका प्रवाशाने याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांच्यापर्यंत पोहोचविली. रेड्डी यांनी लागलीच गडचिरोली पोलीस व आपल्या पथकाला सूचना देऊन पाल नदी गाठली. गडचिरोली ठाण्यातील जवानाने पुराच्या पाण्यात शिरून कारला गाठले आणि दोरखंड व एका ट्रकच्या मदतीने ती कार व त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले.गुंडेनूर व होडरीवासीयांसाठी बोट उपलब्धजिमलगट्टा - भामरागड तालुक्याच्या लाहेरीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या गुंडेनूर, व्होड्री या गावालगतच्या नाल्यावर पूल बांधण्यात आला नाही. त्यामुळे सदर गावातील नागरिकांना आवागमन करण्यासाठी खूप त्रास होत होता. ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार कैलास अंडिल यांनी पाठपुरावा करून गुंडेनूर व व्होड्री या दोन गावासाठी दोन बोट मिळवून घेतल्या. या बोटीचे तहसीलदार अंडिल यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार सोनवने, लाहेरीचे सरपंच पिंडा बोगामी, बालू बोगामी, सुरेश सिडाम यांच्यासह लाहेरी, गुंडेनूर व होडरी या गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
ठिकठिकाणची वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:10 AM
जिल्हाभरात मंगळवारी संध्याकाळपर्यंत आणि काही भागात बुधवारीही बरसलेल्या पावसाने अनेक भागातील मार्ग अडून वाहतूक ठप्प पडली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ही स्थिती कायम होती. दरम्यान अनेक भागात पावसाने उसंत घेतल्याने गुरूवारी सकाळपर्यंत अडलेले बहुतांश मार्ग पूर्ववत सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात ९५.७ मिमी पाऊस : अतिवृष्टीने फुगलेल्या नद्यांनी अडविले अनेक ठिकाणचे मार्ग