लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील होतकरू युवक - युवतींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार थाटण्यासाठी पोलिसांकडून मदतीचा हात पुढे केला जात आहे. गुरूवारी (दि. ७) पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात ब्युटी पार्लर, फोटोग्राफी व कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील बेरोजगार युवक - युवतींना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे हा कार्यक्रम झाला.गडचिरोली पोलीस दल, बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोनापूर आदी विभागांच्या संयुक्त विद्यमाने या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. कृषी विज्ञान केंद्र व बीओआय आरसेटीअंतर्गत ३५ जणांना ब्युटी पार्लर, ३५ जणांना फोटोग्राफी आणि ९७ जणांना कुक्कुटपालन अशा एकूण १६७ युवक - युवतींना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ब्युटी पार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रत्येकी १ नग पार्लर चेअर आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतलेल्या ९७ उमेदवारांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी रोड आयस्लँड रोड जातीचे प्रत्येकी १० नग कुक्कुटपक्षी (चिक्स), त्यांचे खाद्य, भांडी आणि इतर साहित्य वितरित करण्यात आले. याशिवाय फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यापैकी यशस्वी झालेल्या उमेदवारांना शहरी भागात मोठ्या कंपनीत नोकरीकरिता पाठविण्यात येणार आहे.ब्युटी पार्लर, फोटोग्राफी व कुक्कुट पालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, सोमय मुंडे (अभियान), अनुज तारे (अहेरी), पोलीस उपअधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक तथा प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) संदीप कराळे, विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) ज्ञानेश्वर ताथोड, पशुवैज्ञानिक विक्रम कदम, आरसेटीचे संचालक चेतन वैद्य, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम उपस्थित होते.
संधीचा लाभ घेऊन जीवनमान उंचवायावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, जिल्ह्यातील युवक - युवतींना स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमी तुमच्या पाठीशी राहील. आपले मित्र व आप्तस्वकीय यांनादेखील स्वयंरोजगाराच्या बाबतीत माहिती देऊन गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घेऊन आत्मनिर्भर बनावे आणि स्वत:चे जीवनमान उंचवावे.