गडचिराेली : आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालय नागपूर स्तरावरून सन २०२१ मध्ये शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना २० ऑगस्ट २०२१ पर्यंत कार्यमुक्त करण्याचे निर्देश अपर आयुक्तांनी दिले हाेते. मात्र भामरागड प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळांचे बदली झालेले शिक्षक व कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भामरागडचे प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी सत्र २०१९ मध्ये स्थानांतरण झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याबाबतचे आदेश काढले असून, तसे पत्र प्रकल्पातील सर्व आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे. भामरागड प्रकल्पांतर्गत जारावंडी, कसनसूर, हालेवारा, ताेडसा, जांभिया, काेठी, लाहेरी व ताडगाव अशा आठ शासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत. अपर आयुक्त कार्यालय नागपूर स्तरावरून सर्वच ९ प्रकल्पातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या. भामरागड वगळता इतर प्रकल्पातील आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, अनेक शिक्षक व कर्मचारी बदलीच्या नवीन ठिकाणी रूजू झाले आहेत. भामरागड या अतिदुर्गम तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बरेच कर्मचारी आश्रमशाळांमध्ये सेवा देत आहेत. अपर आयुक्तस्तरावरून बदली प्रक्रिया राबविण्यात आल्याने त्यांना न्याय मिळाला आहे. मात्र बदलीच्या नवीन ठिकाणी रूजू हाेण्यासाठी त्यांना अजूनही कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
बाॅक्स...
यांच्या झाल्या बदल्या
आदिवासी विकास विभागाच्या नागपूर अपर आयुक्त कार्यालयांतर्गत ९ प्रकल्प कार्यालय आहेत. यामध्ये गडचिराेली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, देवरी, भंडारा, वर्धा, नागपूर आदींचा समावेश आहे. या प्रकल्पातील बदलीस पात्र उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक तसेच अधीक्षक व अधीक्षिका आदींच्या बदल्या करण्यात आल्या.