दिलीप दहेलकर, गडचिराेली: शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सर्वच विभागातील वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या. मात्र, विविध अडचणी व कारण सांगून विभागप्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना भारमुक्त केले नाही. परिणामी बदली होऊनही अनेक कर्मचारी सुगम भागात दडून बसले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना आता भारमुक्त करण्यात येत असून तसे सक्त आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडवून न ठेवता ३१ मार्च २०२४ पर्यंत संबंधित कार्यालयातून भारमुक्त करावे, असे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.
काेराेना संकटाच्या काळात दाेन वर्षे बदली प्रक्रिया राबविण्यात आली नाही. कारण तशा शासनाच्या सूचना हाेत्या. काेराेनाचा काळ संपल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाच्या सन २०२२ आणि २०२३ या वर्षात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांना संबंधित विभाग प्रमुखांनी भारमुक्त केले, असे कर्मचारी बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू झाले. मात्र, विविध कारणांमुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. परिणामी असे कर्मचारी अजूनही शहरी तसेच सुगम भागात सेवा देत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांची सुगम भागात बदली होऊनही रिलिव्हर न आल्याने त्यांना जुन्या आस्थापनेच्या ठिकाणी व कार्यालयात सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची बदली झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी जुन्या कार्यालयात ठेवू नये, असे आदेशात म्हटले आहे.
प्रशासकीय कामे खोळंबली
संदर्भीय शासन निर्णय दिनांक १५ मे २०१४ अन्वये जिल्हा परिषदेच्या गट- क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार गट-क मधील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया दरवर्षी माहे मे मध्ये पार पाडण्यात येते. परंतु, सन २०२३ आणि त्यापूर्वी सर्वसाधारण बदली प्रकियेमध्ये बदली झालेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना आजतागायत भारमुक्त करण्यात आलेले नाही. सर्वसाधारण बदल्यांमध्ये बदली झालेले कर्मचारी दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्यामुळे त्या कार्यालयातील प्रशासकीय कामे खोळंबलेली आहेत, असे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
खातेप्रमुखांवरही हाेणार कार्यवाही?
ज्या कर्मचाऱ्यांची बदली होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांकडील प्रभार इतर कर्मचाऱ्यांकडे सोपवून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडवून न ठेवता ३१ मार्च २०२४ पर्यंत संबंधित कार्यालयातून भारमुक्त करावे. जे खातेप्रमुख / कार्यालयप्रमुख बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत भारमुक्त करणार नाही, त्यांच्या विरुद्ध उचित प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांची प्रशासकीय किंवा विनंती बदली झाली की, संबंधित कर्मचाऱ्यांना भारमुक्त करणे आवश्यक आहे. तशा सूचना सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सीईओंचे नवे आदेश निघाल्यापासून अनेक खातेप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना भारमुक्त करणे सुरू केले आहे. -शेखर शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जि.प. गडचिराेली.