शिक्षकांचा पुढाकार : स्वच्छतेची कास, धुम्रपानास बंदी, गुणवत्तावाढीवर भररवी रामगुंडेवार एटापल्लीशहरी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावला असल्याचे नेहमीच प्रत्ययास येते. दुर्गम भागात शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता ढासळली असल्याची समज बहुतेकजण करतात. मात्र याला एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत सूरजागड केंद्रातील पामाजीगुडा शाळा अपवाद ठरली आहे. येथील या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या पुढाकाराने दुर्गम भागातील ही शाळा आता शैक्षणिक गुणवत्तेत पुढे आहे. शिक्षक व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून सदर शाळेचा कायापालट झाला आहे.२८ पासून २५ किमी अंतरावर असलेल्या पामाजीगुडा गावाला जाण्यासाठी ३ किमीची पायपीट करावी लागते. पामाजीगुडा गावाची लोकसंख्या २३८ आहे. येथे १९९२ मध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. २८ जून २०१६ रोजी या शाळेत अयाज खलील शेख हे शिक्षक रूजू झाले. त्यावेळी १ ते ४ वर्गात १३ विद्यार्थी पटसंख्या होती. त्यावेळी शाळेची अवस्थाही भकास होती. दरम्यान शेख यांनी या शाळेचा कायापालट करण्याचा निश्चय केला. आता या शाळेत टाईल्स दुरूस्ती करण्यात आली असून वऱ्हांड्याचा वापर अध्यापनासाठी व कार्यालय म्हणून करण्यात येत आहे. ध्वजासाठी खांब लावण्यात आला असून ग्रामस्थांनी बांबूचा वापर करून शाळेच्या संरक्षणार्थ कुंपन केले आहे. शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली असून परिसर स्वच्छता निटनेटकी आहे. येथे ज्ञानरचनावादी पद्धतीतून शिक्षणाचे धडे दिले जात आहे. सन २०१४ मध्ये या शाळेत विद्यार्थी पटसंख्या २६, २०१५ मध्ये २० व २०१६ मध्ये २७ विद्यार्थी पटसंख्या आहे. शालेय परिसरात गुलमोहर, करंजी, कडूलिंब, कॅशिया, सुबाबुळ आदी रोपांचे वृक्षारोपण ग्रामस्थ व शिक्षकांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. शाळेची शैक्षणिक प्रगती पाहून येथील ग्रामसभेने पेसा कायद्याअंतर्गत शाळेला ४० हजार रूपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
दुर्गम पामाजीगुडा शाळेचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2016 12:25 AM