प्रशांत पोतदार यांचे आवाहन : गडचिरोलीत जिल्हा प्रेरणा तथा संकल्प मेळावागडचिरोली : विकासाच्या बाबतीत मागास व मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा पगळा असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ व त्यांचे कार्य प्रभाविपणे पोहोचवा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने रविवारी स्थानिक संताजी स्मृति प्रतिष्ठानच्या सभागृहात जिल्हास्तरीय प्रेरणा तथा संकल्प मेळावा पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआयचे प्राचार्य सुरेश डोंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून अंनिसचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. शिवनाथ कुंभारे, राज्य सरचिटणीस संजय शेंडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पी. एम. जाधव, संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, ओबीसी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. संजय शेंडे यांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचे कार्य केले पाहिजे, असे आवाहन केले. शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू असून कार्यकर्त्यांनी निराश न होता, अपूर्ण राहिलेले त्यांचे कार्र्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले. अंनिसच्या महिला विभाग प्रमुख स्मिता लडके यांनी जानेवारी २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत सदस्य नोंदणी व कार्य करून संघटनेस योगदान दिले याबद्दल त्यांना प्रशांत पोतदार यांच्या हस्ते ‘जिल्हा साथी पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. संचालन अंनिसचे पुरूषोत्तम ठाकरे यांनी केले तर आभार प्रा. विलास पारधी यांनी मानले. यावेळी किशोर पातर, जयश्री कांबळे, हेमंत उपाध्ये, मारोती दुधबावरे, दामोधर उप्परवार, सुरेंद्र मामीडवार, देवानंद कामडी, विवेक मून, पंकज वनकर, सुनीता चुधरी हजर होते. दुधबावरे, राऊत, बांगरे, चौधरी, संध्या येलेकर, महानंदा निंबोरकर, ग्रिष्मा मून, चांदेवार, येलावार यांनी सहकार्य केले.
अंनिसची चळवळ गावागावात पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 12:42 AM