गडचिरोली : दारू तस्करी करणारे इसम पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) येथील दारू तस्करांनी दारू तस्करीसाठी चारचाकी अथवा दुचाकी वाहनांचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देशाने बैलगाड्यांच्या साहाय्याने तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदीपात्रातून दारू आणली. मात्र, पाेलिसांच्या गाेपनीय माहितीने याचा पर्दाफाश झाला. २७ फेब्रुवारीच्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून तीन बैलगाड्यांमधील दोन लाख ५२ हजार रुपयांची दारू जप्त केली.
टेकडा (ताला) येथील दारू तस्कर संदीप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारूची आयात करून बैलगाडीच्या माध्यमातून वाहतूक करणार असल्याची गाेपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलिस निरिक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथून पथक रवाना करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टेकडा गावालगत असणाऱ्या नदी परिसरात सापळा रचला. टेकडाच्या दिशेने तीन बैलगाड्या येत हाेत्या. तीनही बैलगाड्यांमध्ये ५० बाॅक्स विदेशी दारूचा साठा दिसून आला. त्याची किंमत २ लाख ५२ हजार रुपये एवढी आहे. बैलगाड्या व बैलांची किमत १ लाख ७० हजार रुपये एवढी आहे. दारू व बैलगाड्या असे मिळून सुमारे ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उप पोलिस स्टेशन बामणी येथे आरोपी संदीप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापू मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम, सर्व रा. टेकडा (ताला) यांच्या विराेधात गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई सहायक पाेलिस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, दीपक लोणारे यांनी केली.