प्रशिक्षण पूर्ण : पोलीस व जिल्हा महिला बालविकास विभागाचा पुढाकारगडचिरोली : बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार यामध्ये पीडित महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आहे. अशा घटनांमधील पीडित व्यक्तीला सहाय्य करण्याकरिता जिल्हा ट्रॉमा टीम तयार करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व जिल्हा महिला बालविकास यांच्या संयुक्त मार्गदर्शनात बुधवारी गडचिरोली व गुरूवारी अहेरी येथे ही टीम तयार करून प्रशिक्षण देण्यात आले. महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार यामध्ये पीडित महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजना २० आॅक्टोबर २०१३ पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार यामध्ये पीडित महिला व बालक यांना तातडीने आधार मिळण्याकरिता व मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी साह्य करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात मनोधैर्य टीम (जिल्हा ट्रॉमा टीम) गठित करण्यात आली असून सदर गठित टीममध्ये पोलीस विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या अधिपत्याखालील सर्व संरक्षण अधिकारी, बाल परिविक्षा अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा सहभाग आहे. सदर टीममध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालयस्तरावर पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसोपचार तज्ज्ञ आणि नर्स आदींचा समावेश राहणार आहे. बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार आदी घटना नंतर संबंधित महिला व बालक, कुटुंबातील सदस्य जाब-जबाब देण्याच्या मन:स्थितीत नसतात. सदर घटनेनंतर त्यांना त्या आघातातून बाहेर काढण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी या टीमची स्थापना करण्यात आली.सदर प्रशिक्षणामध्ये बलात्कार, बलात्कारावरील लैंगिक अत्याचारित घटनातील महिला व बालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या आघातातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यातील गठित ट्रॉमा टीममधील सदस्यांना तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रशिक्षण देण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
अत्याचार पीडितांच्या मदतीसाठी ट्रॉमा टीम तयार
By admin | Published: January 14, 2017 12:55 AM