लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आंध्र व महाराष्ट्र अशा दोन्ही राज्याच्या नागरिकांना जोडणारी एकमेव साधन असलेले डुगडुगी आज इतिहास जमा होताना दिसत आहे.महाराष्ट्राच्या अंतिम सीमेवर असलेला सिरोंचा तालुका, तालुक्याला लागून प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्या वाहतात. सीमेला लागून तेलंगाना, छत्तीसगढ राज्य असल्याने येथील लोकांचे रोटी बेटी संबंध तीन राज्याचा लोकांचे असायचे. स्वातंत्यपूर्व काळापासून ते २०१४ पर्यंत येथील नागरिकांना या राज्यात जायला एकच पर्याय होता, तो म्हणजे नदीतून डोंग्याने प्रवास!
सिरोंचा तालुक्यात तीन नदी घाट आहेत सिरोंचा, नगरम, पातगूडम या तीन नदीघटाद्वारे डोंग्याचा सहाय्याने नदीच्या अलीकडे पोहचले जायचे. 40 ते 50 लोकांना बसवून नेण्याची क्षमता असणारी डोंगा दररोज सकाळी 6 ते सायं 7 वाजेपर्यंत पाण्यात डुगडुग करीत धावायचा. परंतु आजच्या परिस्थितीत तीन नद्यांवर पूल निर्माण झाल्याने ही डुगडुगी आता इतिहास जमा झाली आहे.डोंगा चालक समाज त्यांचा पुर्वजापासून डोंगा व्यवसायावर अवलंबून होता मात्र आता त्याला कामाचा दुसरा पर्याय शोधावा लागत आहे. शासन यांचा विचार करून पर्यटन दृष्टीकोनातून बोटिंग सुरू केल्यास डोंगा चालवणाऱ्या वर्गाला विकासाचा मार्ग मिळेल. मात्र सध्या तरी तीन नदी घाट निर्मनुष्य, शांत, संपूर्ण परिसर रिकामा रिकामा दिसत आहे.