कोरची : तालुक्यातील राजाटोला (मसेली ) येथे मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसन उपचार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या माध्यमातून एकूण १५ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला.
शिबिराला भेट दिलेल्या १५ रुग्णांवर उपचार व औषधोपचार करण्यात आले. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची व्यसन सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती देत छत्रपती घवघवे यांनी व्यसनी रुग्णांना समुपदेशन केले. संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची माहिती घेतली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक निळा किन्नाके यांनी केले. यशस्वितेसाठी पोलीसपाटील श्रीराम कोल्हे, गाव संघटन अध्यक्ष सुंदर कोल्हे, मुख्याध्यापक एन. डी. कोल्हे, सहायक शिक्षक के. डी. कुंभरे, यशवंती हिडामी, निलवंती कोल्हे, लचवंती कोल्हे यांनी सहकार्य केले.