गडचिराेली : चंद्रपुरातील रेल्वे स्थानकानजीकच्या बीएसएनएल कार्यालयाजवळ असलेला क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा महानगरपालिका प्रशासनाने हटविला. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा पुतळा सन्मानाने पुन्हा त्याच जागी बसवावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचा माेलाचा वाटा आहे. आदिवासींचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात हाेती. सहा महिन्यांपासून समाजबांधवांनी प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्जही दिला हाेता. परंतु, प्रशासनाने काेणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे समाजबांधवांनी लाेकवर्गणीतून पुतळा बसविला. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने हा पुतळा हटविला.
या कारवाईमुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त करत बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने त्याच जागेवर बसवावा, अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश महासचिव आर. यू. केराम, विदर्भ अध्यक्ष ॲड. मनिराम मडावी, जिल्हाध्यक्ष घनश्याम मडावी, विदर्भ संपर्क प्रमुख सचिन पालकर, कार्याध्यक्ष नामदेवराव मसराम, उपाध्यक्ष नारायण मडावी यांनी केली आहे.