लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासींचे प्रेरणास्थान पहांदी पारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत मानून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी परंपरा व भाषा टिकवून ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी बजाविली. त्यामुळे आदिवासी समाज बांधवांनी समाजातीलच लोकांना पुढे करावे. सर्व समाजबांधवांनी एकजूट होऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा, असे आवाहन जि. प. बांधकाम व वित्त नियोजन सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केले.तालुक्यातील वांगेपल्ली येथे सल्ला गांगरा (पेरसापेन) उबसना पंडुम तथा भव्य समाज प्रबोधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. सदस्य अॅड. लालसू नोगोटी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सुभाष पोट्टी सडमेक होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, विद्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत, महेश मडावी, दिवाकर वेलादी, संपत सोयाम, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच पुष्पा आत्राम, भारती इष्टाम, वासुदेव मडावी, सतीश आत्राम, पौर्णिमा इष्टाम उपस्थित होते.याप्रसंगी जि. प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते गोंडी ध्वज फडकविण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त करून आदिवासी समाजाची संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेला नृत्य आणि आदिवासी महापुरुष, देवतांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. तसेच वांगेपल्ली येथे आदिवासींचे प्रतीक मानला गेलेल्या सल्ला गांगरा प्रतिष्ठापना तसेच सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंडीधर्म प्रचारक सत्यनारायण कोडापे, संचालन प्रकाश तलांडे तर आभार संतोष कोडापे यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
आदिवासींनी एकजूट व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:53 AM
आदिवासींचे प्रेरणास्थान पहांदी पारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत मानून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी परंपरा व भाषा टिकवून ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी बजाविली.
ठळक मुद्देजि. प. सभापतींचे आवाहन : वांगेपल्ली येथे समाज प्रबोधन कार्यक्रम