कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुरुषोत्तम दोनाडकर होते. उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती नीता ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हरीश सवई, उपसरपंच सुरेश ढोरे, पोलीस पाटील शकुंतला पत्रे, राजेश्वर ठाकरे, तालुका कृषी अधिकारी टी. डी. ढगे, कृषी पर्यवेक्षक ए. आर. हुकरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. डी. रहांगडाले, कृषी सहाय्यक एन. सी. कुंभारे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. हरीश सवई म्हणाले, परजीवी मित्रकीटकांपैकी ट्रायकोग्रामा हा एक अळीवर्गीय किडीच्या अंड्यावर उपजीविका करणारा महत्त्वाचा मित्र कीटक आहे. प्रयोगशाळेत ट्रायकोकार्डस् मोठ्या प्रमाणात तयार करता येतात. शेतकरी त्यांच्या शेतात वापरण्या इतपत अथवा व्यावसायिक स्वरूपात ट्रायकोकार्ड स्वतः तयार करू शकतात. त्याकरिता ज्वारीच्या भरड्यावर जगणाऱ्या कोर्सेरा नावाच्या किडीची जोपासना करून त्यांच्या अंड्यावर ट्रायकोग्रामा मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. २.५ किलो ज्वारीचा भरडा, प्लास्टिक बॉक्स, टोपली, १०० ग्राम शेंगदाण्याचा कूट, ५ ग्राम यीस्ट पावडर, ५ ग्राम गंधक भुकटी त्यात चिमूटभर स्ट्रेप्टाेमायसिन आदी साहित्य लागते. प्रत्येक टोपलीमध्ये वरील संपूर्ण मिश्रण हळुवारपणे मिसळून घ्यावे. या मिश्रणावर दहा हजार काेर्सेरा अंडी सोडावेत व टोपली सुती कापडाने बांधून घ्यावी. साधारणत: ४० ते ४५ दिवसांत पतंग तयार होतात. तयार झालेले पतंग दररोज काचेच्या परीक्षानळीने गोळा करावीत. गोळा केलेले पतंग विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या बकेटमध्ये सोडावे. दररोज सकाळी अंडी गोळा करून ती अंडी पोस्टकार्डसारख्या डिंक लावलेल्या सेंचुरी कागदावर चहा गाळणीच्या साहाय्याने एकसारखी पसरावी व ते कार्ड सावलीत ३० मिनिटे वाळवावे. नंतर सदर कार्ड १५ व्हॅटच्या अतिनील किरणाखाली ३० मिनिटे ठेवावे. जेणेकरून कार्डवरील अंडी वांज होतील. नंतर सदर कार्ड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून सोबत मातृकल्चरचा तुकडा सोडून पिशवीचे तोंड बंद करावे. ४-५ दिवसात अंडी काळी पडतात. म्हणजेच त्यात ट्रायकोग्रामा कीटकांची वाढ पूर्णपणे झाली असे समजावे. तयार झालेले कार्ड लगेच शेतात वापरावे. शेतात ट्रायकोग्रामा सोडल्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये. ट्रायकोग्रामा वापरल्याने कीटकनाशकावर होणारा खर्च कमी होतो. अर्थातच ट्रायकोग्रामा जापाेनिकम धानावरील खोडकिडा आणि ट्रायकोग्रामा चीलोनिस वांगीवरील शेंडे व फळ पोखरणारी अळी व अंडी अवस्थेतच नियंत्रण मिळवता येते, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन ए. एल. केराम यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.