गडचिरोली : जिल्हयाच्या आष्टीवरून मार्कंडा (कं.) कडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना मार्कंडा (कं.) क्रासींगवर २४ एप्रिल राेजी बुधवारला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. यात आजोबा गंभीर तर दोन नातवंड किरकाेळ जखमी झाले आहेत. एम. एच. ३४ बी.जी. ४२२४ क्रमाकाचा ट्रक आष्टीकडून मार्कंडा (कं)कडे भरधाव वेगाने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्र. एम. एच. ३३ के २१४५ ला जब्बर धडक दिल्याने दुचाकी ट्रकच्या समोरील चाकात फसली. या अपघातात दुचाकीवरील आजोबा गंभीर तर दोन नातवंड किरकोळ जखमी झाले आहेत. प्रभाकर लोणारे (५२) रा.मार्कंडा (कं) हे गंभीर आहेत. जखमी नातवंडाची नावे रिदांश कैलास लोणारे (७) आणि सिदांश कैलास लोणारे (५) अशी आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रभाकर लोणारे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. दोन नातवंडावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मार्कंडा (कं.) च्या क्रासींगवर सुरजागड लोह प्रकल्पाचे तीन सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत मात्र ते एकाच ठिकाणी बसून बघ्याची भूमिका घेत आहेत असे असेल त्या सुरक्षारक्षकांचे काम तरी काय असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. या ठिकाणी क्रासींग असल्याने मार्कंडा (कं) कडून येणाऱ्या वाहनांना आष्टी कडून येणारे वाहन दिसून येत नाहीत तेव्हा सदर सुरक्षा रक्षकांनी त्याच वळणावर दोन्ही बाजूला तत्परतेने नजर ठेवल्यास असे अपघात टाळण्यासाठी मदत होते, यावर संबंधीतांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.