सिरोंचा : आदिवासी भागात बहुतांश मुले कमी वजनाची जन्माला येतात. तेव्हा महिलांनी सुदृढ बालकाला जन्म द्यावा, या उदात्त हेतूने डॉ. अब्दुल कलाम अमृत सकस आहार योजना महिला व बालकल्याण मंत्रालयाने सुरू केली आहे. मात्र या योजनेतून चवथ्या व पाचव्या महिन्यांच्या गर्भवती महिलांना सकस आहारा योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला.सिरोंचा येथे आयोजित अंगणवाडी महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा मंगळवारी पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खैरून शेख होत्या. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. दहिवडे म्हणाले की, सकस आहार अमृत योजनेंतर्गत सर्व गर्भवती महिलांना सकस आहार पुरवठा करत असाल तर त्याचे समर्थन केले जाईल. परंतु केवळ सात, आठ व नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलांनाच सकस आहार देणार असाल व चवथ्या व पाचव्या महिन्याच्या गर्भवती महिलांना आहारापासून वंचित ठेवणार असला तर याला अंगणवाडी महिला कर्मचारी विरोध करेल. गर्भवती महिलांची व्याख्या बदलविण्याचा शासनाला अधिकार नाही, सकस आहार योजना सर्वच महिलांकरिता सुरू ठेवावी, यात भेदाभेद करता कामा नये, अशी मागणीही प्रा. दहिवडे यांनी यावेळी केली. या मेळाव्याला सुमन तोकलावार, रामबाई कोठारी, यशोदा दुर्गे, प्रभा बारेकर, कौशल्या कुमरी, शोभा गोली, माया तेरकरी, संगीता वडलाकोंडावार आदी उपस्थित होते. सुमन तोकलावार यांनी आभार प्रदर्शन केले. १९ जानेवारी रोजी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन चंद्रपूर येथील गांधी चौकात दुपारी १२ वाजता केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
चवथ्या, पाचव्या महिन्यांच्या गर्भवतींना बाद करण्याचा प्रयत्न
By admin | Published: January 01, 2016 2:31 AM