लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : रात्रीच्या वेळी घरात झाेपलेल्यांना काेंडून बाहेरून कुलूप लावून घराला आग लावण्याचा प्रकार शुक्रवारच्या मध्यरात्री तालुक्यातील काेटगूल येथे घडला. घरातील लाेकांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणारी ती व्यक्ती काेण? याचा उलगडा अद्याप झाला नाही. दरम्यान या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.सदर अज्ञात व्यक्तीने घराला बाहेरून कुलूप लावून घर व बाहेरील दुचाकीला आग लावली. दरम्यान घरात झाेपलेल्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी आरडाओरड करत खिडकी ताेडून आपली सुटका केल्याने ते सुखरूप बचावले. प्राप्त माहितीनुसार, कोटगूल येथील मुख्य बाजार चौकातील बिंदियाबाई चिमनसिंग हारामी (वय ६५ वर्षे) यांच्या मालकीच्या घरी मिलिंद टेंभूरकर हे आपल्या पत्नीसह भाड्याने वास्तव्यास होते. शनिवारी रात्री टेंभूरकर दाम्पत्य झोपेत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या मोटारसायकल व घराला आग लावली. आग लावण्याच्या पूर्वी टेंभूरकर यांच्या खाेलीच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. आगीच्या धुरामुळे काही वेळातच आग लागल्याचे लक्षात येऊन टेंभूरकर दाम्पत्य जागे झाले. त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी बाजूच्या भाडेकरूला आवाज दिले. त्यांच्या मदतीने घराची खिडकी तोडून हे दाम्पत्य कसेबसे घराबाहेर निघाले आणि त्यांनी आपला जीव वाचविला. मात्र दुचाकी जळून खाक झाली.या आगीत घरमालकाचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय भाडेकरू टेंभूरकर यांच्या घरगुती सामानासह सोने-चांदी व मोटारसायकल, तसेच रोख रक्कम पकडून अंदाजे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.टेंभूरकर दाम्पत्याला घरात जीवंत पेटवून मारण्याचा प्रयत्न करणारा आराेपी काेण? याचा शाेध घेण्याचे आव्हान पाेलिसांपुढे निर्माण झाले आहे. आराेपीने मनात काही तरी राग ठेवून हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गॅस सिलिंडरचाही झाला स्फाेटघराला लागलेल्या आगीची आस गॅस सिलिंडरपर्यंत पाेहाेचून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराची भिंत काेसळली. घरातील पूर्ण सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सी.आर. भंडारी व कोटगूल पोलीस मदत केंद्रातील पोलीस अधिकारी आनंद जाधव, तलाठी, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कोतवाल यांनी घटनास्थळ गाठून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.