लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून खरीप हंगामात केवळ धान पिकाचे उत्पादन घेत असतात परंतु दिवसेंदिवस धानाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने ही शेती तोट्यात आली आहे. त्यामुळे धान पिकासोबत शेतकरी आता इतरही पिकांकडे वळले आहेत. तालुक्याच्या कळमगाव येथील शेतकरी अशोक तुकाराम तुंबडे यांनी आपल्या शेतात अद्रक व हळद पीक लागवड केली असून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू पाहत आहे.
शेतकरी अशोक तुंबडे गेल्या चार-पाच वर्षांपासून हळद पिकाचे उत्पादन घेत आहेत. या शेतीतून थोडाफार नफा मिळू लागला. त्यामुळे यावर्षी त्यांनी हळद पिकासोबत अद्रक पिकाची लागवड केली आहे. साधारणपणे या दोन्ही पिकाची लागवड मे ते जून दरम्यान करण्यात आली. पीक सध्या समाधानकारक आहे. शेतकरी दरवर्षी अधिक उत्पादन व्हावे या हेतूने लागवड करीत असतो मात्र धान पिकांची शेती करण्यासाठी उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकरी आपला आर्थिक स्तर उंचवण्यासाठी भाजीपाला व मका हे पीक हे पीक घेत आहेत. यासोबतच शेतकरी आता हळद व अद्रक पीक घेण्याकडे वळले आहेत.
शेतकरी सद्यस्थितीत शेतीपूरक व्यवसाय करू लागले आहेत तसेच बदलत्या काळानुसार शेती व्यवसायात आमूलाग्र बदल घडून येत आहे. शेती व्यवसायात तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शेती उत्पादनातंही व पीक लागवड क्षेत्रात बदल घडून येत आहेत. शेतकरी धान पिकासोबत इतर पिकांचे उत्पादन घेत आहे खेडेवजा गावातील शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत योग्य माहिती योग्य वेळी मिळत नाही तरीही शेतकरी इतर पीक घेऊ लागले आहेत कळमगावातील ही शेती तालुक्यासह जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.हळद व अद्रक मिळून चार क्विंटल उत्पादन होणारशेतकरी अशोक तुंबडे यांनी गतवर्षी हळदीचे पीक घेतले. यावर्षी हळद पिकासोबतच अद्रक पिकाचीही लागवड केली आहे. सध्या हे पीक चांगले असून दोन्ही मिळून चार क्विंटल उत्पादन होणार, असा अंदाज तुंबडे यांनी व्यक्त केला आहे. बाजारपेठ उपलब्ध नसल्याने उत्पादन झालेल्या मालाची विक्री गावांत होत असते लागवडी खालील क्षेत्र पुढील वर्षी वाढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. कृषी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या शेतावर येऊन हळद व अद्रक पिकाच्या लागवडीची पाहणी केली आहे, असे तुंबडे यांनी सांगितले.