लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने तलावांमध्ये अत्यल्प साठा आहे. त्यामुळे मच्छीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९३ मच्छीपालन सहकारी संस्था आहेत. आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी व देसाईगंज तालुक्यातील मच्छीपालन संस्था पारंपरिक पध्दतीने मच्छीमारी करणाºया ढिवर समाजाकडे कायम आहेत. मात्र पेसा अंतर्गत गावांमधील तलाव व बोड्यांची मालकी संबंधित गावाकडे गेल्याने मच्छीपालन संस्थांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला मच्छीबीज टाकले जाते. सदर मच्छी मोठी झाल्यानंतर सर्वसाधारपणे उन्हाळ्यात मासेमारी केली जाते. मात्र यावर्षी तलाव, बोड्यांमध्ये अल्पसाठा आहे. धान पिकासाठी हा पाणीसाठा वापरला जात आहे. परिणामी सदर तलाव, बोड्या डिसेंबर जानेवारी महिन्यातच कोरड्या पडण्याची शक्यता आहे. परिणामी याच महिन्यात मासेमारी करावी लागणार आहे. या कालावधीत मासे पूर्ण वाढ झालेले राहत नसल्याने त्यांचे वजन कमी राहते. याचा फार मोठा फटका संबंधित संस्थांना बसणार आहे. काही संस्थांचा खर्चही भरून निघणे कठीण होणार आहे. वनहक्क कायद्यानुसार तलावांमध्ये अधिकार संबंधित गावांकडे दिले आहेत. यातील काही तलाव व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिले आहेत. काही तलावांमध्ये मासेमारी होत नाही. परिणामी मागील काही दिवसांपासून मत्स्यपालनात कमालीची घट झाली आहे.सहकारी संस्थांकडे पेसातील तलाव द्यापेसा कायद्यानुसार गावाच्या सीमेतील तलावाची मालकी संबंधित गावाकडे दिले आहे. मात्र काही गावे मासेमारीचा व्यवसाय करीत नाही. अशी गावे सहकारी संस्थांना भाडेतत्वावर द्यावी, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थेचे रोहिदास दुमाने, कुंडलिक धनकर, विनोद कांबळे, खुशाल पंडेलगोटा, गोमाजी भोयर, विजय जराते, रघुनाथ मानकर, गोमा भोयर, रघुनाथ धनकर, कमल धनकर, कमल मेश्राम यांनी केली आहे.मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी शासनाचा स्वतंत्र विभाग आहे. मात्र सदर विभाग कोणतीच मदत करीत नाही. शासनाकडून सुटीवर मत्स्यबीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे महागडे बिज खरेदी करावे लागते.- जी. बी. धनकर, सचिव,मत्स्यपालन संस्था, वैरागड
मासेमारी व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:17 AM
यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने तलावांमध्ये अत्यल्प साठा आहे. त्यामुळे मच्छीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
ठळक मुद्देतलावांमध्ये अल्प जलसाठा : मत्स्यपालन सहकारी संस्थांचे नुकसान