गडचिराेली : शिक्षण मंडळाकडून बारावीचे मूल्यमापन हे दहावी, अकरावी वार्षिक गुण आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांमधील गुणांच्या आधारे करण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात काेराेनामुळे इयत्ता अकरावीची वार्षिक परीक्षा झाली नाही. यावर्षी बहुतांश विद्यार्थ्यांच्या बारावीतील अंतर्गत परीक्षादेखील झालेल्या नाहीत. मूल्यमापनाचे सूत्रही अद्याप निश्चित झालेले नाही. अधिकाधिक विद्यार्थी हे अकरावीला रेस्ट इयर मानतात. मूल्यमापनात अकरावीतील ४० टक्के गुणांचा विचार झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणदानावर परिणाम झाला आहे.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीपाठाेपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ३ जूनला जाहीर केला. गडचिराेली जिल्ह्यात कला, विज्ञान व वाणिज्य या तिन्ही शाखा मिळून बारावीची एकूण विद्यार्थी संख्या १४ हजारांच्या आसपास आहे. काेराेनामुळे उन्हाळ्यात इयत्ता बारावीची बाेर्डाची परीक्षा झाली नाही. निकाल काेणत्या पद्धतीने व कसा लागणार याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये चिंता दिसून येत आहे.
बाॅक्स...
बारावीसाठी असे गुणदान हाेण्याची शक्यता
सीबीएसईने इयत्ता बारावीच्या मूल्यकनासाठी ३० : ३० : ४० अर्थात दहावी : अकरावी : बारावीचे गुण असे सूत्र निश्चित केले. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाने निर्णय घ्यावा, अशी काही पालकांकडून मागणी हाेत आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून २० : ४० : ४० या सूत्राचा विचार केला जात आहे.
बाॅक्स..
विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता
इयत्ता बारावीसाठी आम्हा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी इयत्ता दहावीचे २०, इयत्ता अकरावीचे ४० आणि बारावीतील ४० गुणांचा आधार घेणे हे सूत्र व्यक्तीशा मला याेग्य वाटते. शिक्षण मंडळाने या सूत्राचा विचार करणे आवश्यक आहे.
- प्रतीक रायपुरे, विद्यार्थी
.................
इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करून आता एक महिना पूर्णत: उलटला आहे. आम्हा विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याचा विचार करून राज्य शासनाने लवकरात लवकर मूल्यमापनाचे सूत्र निश्चित करून निकाल जाहीर करावा.
- संगीता सिडाम, विद्यार्थिनी
बाॅक्स...
अकरावीत कमी गुण असल्यास हाेऊ शकते नुकसान
इयत्ता दहावीला गुणवत्तेत असणारे विद्यार्थी शक्यता अकारावीकडे दुर्लक्ष करत नाही. मात्र, अशा विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. बहुतांश विद्यार्थी इयत्ता अकरावीकडे केवळ उत्तीर्ण हाेण्याच्या दृष्टीने पाहतात. अशा विद्यार्थ्यांच्या गुणदान प्रक्रियेवर परिणाम हाेण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाने याेग्य सूत्र वापरून निकाल जाहीर करावा.
- सागर म्हशाखेत्री, प्राचार्य
............
इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी दहावी, अकरावीच्या गुणांचा विचार हाेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास इयत्ता अकरावीत कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना थाेडा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांचे नुकसान हाेऊ शकते. इयत्ता बारावीचा निकाल अजूनही जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचे नियाेजन थांबले आहे.
- सुनील चंदनगिरीवार, प्राचार्य
बाॅक्स...
अकरावी तर ‘रेस्ट इयर’
- महाविद्यालयीन शिक्षणातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या दहावीमध्ये वर्षभर अभ्यासाचा तणाव सहन करून विद्यार्थी इयत्ता अकरावीमध्ये येतात. पुढे उच्चशिक्षण घेण्याच्या दृष्टीने इयत्ता बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने बहुतांश विद्यार्थी हे इयत्ता अकरावीकडे ‘रेस्ट इयर’ म्हणून पाहत आहे. केवळ अकरावी उत्तीर्ण हाेण्याला अनेकजण महत्त्व देतात.
- इयत्ता अकरावीच्या परीक्षेमध्ये गुण मिळविण्यापेक्षा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी हाेऊन अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासावर भर देतात.
बाॅक्स..
गेल्यावर्षी अकरावीच्या परीक्षा झाल्याच नाहीत..
- इयत्ता अकरावीचा निकाल २०० गुणांच्या आधारे लावण्यात येताे. त्यात दाेन घटक चाचणीचे प्रत्येकी २५ गुण, सहामाही परीक्षेतील ५० गुण व वार्षिक परीक्षेच्या १०० गुणांचा समावेश असताे.
- गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे अकरावीची परीक्षा झाली नाही.