लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गडचिरोलीच्या दिशेने जात असलेल्या एका कारला नाकेबंदी करून अडवत त्या कारमधून पोलिसांनी अडीच लाख रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त केली. मात्र त्या गाडीचा चालक पोलिसांसमोर गाडीची चावी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई गुरूवारी रात्री देसाईगंजच्या आरमोरी मार्गावर करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, कुरखेडाचे एसडीपीओ शैलेश काळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंज ठाण्याचे निरीक्षक सिद्धानंद मांडवकर, एएसआय रेकचंद पत्रे व त्यांच्या पथकाने आरमोरी मार्गावर असलेल्या निरंकारी भवनाजवळ रात्री नाकेबंदी केली. दरम्यान टाटा नेक्सा या गाडीला (एमएच ४९, एएस २६९७) थांबविताच गाडीचालक गाडीची चावी घेऊन अंधाराचा फायदा घेत पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो हाती लागला नाही.त्या गाडीची तपासणी केली असता त्यात इंपेरिअल ब्लू या विदेशी दारूचे ६ बॉक्स (किंमत ८६ हजार ४०० रुपये) आणि रॉकेट संत्रा या देशी दारूचे ३२ बॉक्स (किंमत १ लाख ६० हजार रुपये) आढळले. ती सर्व दारू जप्त करण्यात आली. ती गाडी नागपूर पासिंगची असून पोलिसांनी गाडीमालकाचे नावही मिळविले आहे. मात्र चेसिस क्रमांकावरून गाडीमालकाचे खरे नाव मिळवून त्याच्यावर कारवाई होईल असे तपास अधिकारी पो.उपनिरिक्षक स्वाती फुलेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.विशेष म्हणजे ही गाडी वडसातील तुकूम वॉर्डमधील चोरमार्गाने आरमोरीच्या दिशेने निघाली होती. यावरून गाडीचालक हा दारूचा साठा पोहोचविण्यात तरबेज असून तो नेहमी या पद्धतीने आरमोरी व गडचिरोलीच्या दिशेने दारू नेत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र ती दारू कुठून येत होती याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे.
कारसह अडीच लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:33 AM
गडचिरोलीच्या दिशेने जात असलेल्या एका कारला नाकेबंदी करून अडवत त्या कारमधून पोलिसांनी अडीच लाख रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त केली. मात्र त्या गाडीचा चालक पोलिसांसमोर गाडीची चावी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
ठळक मुद्देचालक फरार : नागपूरमधील ‘त्या’ गाडीचा मालक कोण?