एटापल्ली : कोतवाल पदाची तोंडी व लेखी परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचे गुण असलेली यादी दोनदा लावण्यात आल्याने ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला असून या परीक्षेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. तोंडी परीक्षा घेतल्यानंतर १३ जून रोजी कोतवाल पद भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला. या यादीत तोंडी व लेखी गुणांचा समावेश होता. सकाळी ९ वाजता लावण्यात आलेल्या यादीत सतिश हरिदास दुर्गे रा. तोडसा याला ४२ गुण दाखविण्यात आले होते. ही यादी फाडून टाकून दुपारी २ वाजता दुसरी यादी लावण्यात आली. या यादीत सतिश दुर्गेला ६० गुण देण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या यादीत गुणांमध्ये फरक असल्याचे लक्षात येताच उमेदवारांमध्ये एकच गोंधळ उडाला. या भरतीत घोळ झाला असल्याचा आरोप करून या परीक्षेची सखोल चौकशी करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून कुंदन दुर्गे, लुला तलांडे, जीवन तलांडे, सुमित्रा चांदेकर, वैशाली सोनटक्के, अजय कांबळे, सुरेश डोंगरे, तुळशिराम पुंगाटी, हरिदास दुर्गे यांनी केली. पं. स. सदस्य दिलीप कुलसंगे, युवाशक्तीचे तालुकाध्यक्ष अलेश्वर गादेवार उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्यासोबत या संपूर्ण उमेदवारांनी चर्चा केली असता, जितेंद्र पाटील यांनी तांत्रिक चुक झाल्याचे सांगितले. मात्र ही चुक लिखित स्वरूपात लिहून द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी लावून धरली असता, पाटील यांनी लेखी लिहून दिले. त्याचबरोबर लेखी व तोंडी परीक्षेवर मी स्वत: नियंत्रण ठेवले. त्यामुळे घोळ झाला नसल्याचे सांगितले. काही उमेदवारांनी खोटे रहिवासी प्रमाणपत्र जोडून परीक्षा दिली असल्याचा आरोपही तुळशिराम पुंगाटी यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कोतवाल पदाची लावली दोनदा यादी
By admin | Published: June 14, 2014 2:16 AM