न्यायालय : गोकुळपेठ बाजारातील खून नागपूर : गोकुळपेठ बाजारात २९ सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या १.५० वाजताच्या सुमारास झालेल्या सचिन सोमकुवर याच्या खूनप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी डी. पी. रागीट यांच्या न्यायालयात हजर करून आरोपींचा ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला. मोहम्मद अशफाक ऊर्फ बिट्टू अहमद जुबेर अन्सारी (३२)रा. कामठी रोड आम्रपाली अपार्टमेंट आणि अंकित राजकुमार पाली (२५) रा. सुदामनगरी, अशी आरोपींची नावे आहेत. पांढराबोडी मुंजेबाबा आश्रम ले-आऊट येथील रहिवासी सचिन प्रकाश सोमकुवर आणि त्याचा मित्र सूरज अशोक डोंगरे यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार करून सचिनचा घटनास्थळीच खून केला होता तर सूरजला गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पोलिसांनी बिट्टू आणि अंकित पाली या दोघांना अटक केली होती. त्यांचा तिसरा साथीदार राजेश परतेकी हा मात्र फरार आहे. सहायक पोलीस निरीक्षक सूरज एस.सुरोशे यांनी बिट्टू आणि पाली यांना न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ए. पी. सिंग यांनी आरोपींचा सात दिवसांचा पोलीस कोठडी मिळावा, अशी विनंती करताना न्यायालयाला सांगितले की, घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून मुख्य आरोपी राजेश परतेकी हा फरार आहे. त्याचा ठावठिकाणा या दोन आरोपींना माहीत आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि इन्डोव्हर नावाची मोटार जप्त करणे आहे. आरोपींचे वकील अॅड. ओमप्रकाश मासुरके आणि अॅड. प्रफुल्ल मोहगावकर यांनी आरोपींचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे सांगून कमीत कमी पोलीस कोठडी रिमांड देण्यात यावा, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून दोन्ही आरोपींना ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
दोन आरोपींना ४ आॅक्टोबर पर्यंत पीसीआर
By admin | Published: October 02, 2016 2:57 AM