लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : होळी आणि रंगोत्सवात न्हाऊन निघताना मद्याच्या नशेची झिंग देण्याचे स्वप्न पाहात असलेल्या दारू तस्कराला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यरात्री जोरदार झटका दिला. यात विदेशी दारूच्या पेट्यांसह दोन कार जप्त करण्यात आल्या. जप्त केलेली दारू आणि वाहने मिळून ८ लाख ८७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, होळीसाठी गोंदिया जिल्ह्यातून दारूची आयात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. त्यात दोन्ही कारमधून बीअर, व्हिस्कीच्या पेट्या जप्त केल्या. त्यात रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की (किंमत १ लाख २९ हजार ६०० रुपये), इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की (७२ हजार), बीअर (३६ हजार) तसेच दोन कार (किंमत ६ लाख ५० हजार) अशी २ लाख ३७ हजारांची दारू आणि ६ लाख ५० हजारांच्या कार असा ८ लाख ८७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.पोलीस हवालदार सत्यमकुमार लोहंबरे यांच्या तक्रारीवरून दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. दारुबंदी असतानाही होळी आणि रंगपंचमीनिमित्त मोठ्या प्रमाणात अवैध दारूची मागणी वाढते. त्यासाठी दारू आयात वाढल्याने पोलिसांनी गस्त वाढविली असल्याचे दिसून येते.
एका वाहनातून भरते होते दुसऱ्या वाहनात- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री १२.३० ते १.३० यादरम्यान कढोली जंगल परिसरातून जाणाऱ्या मार्गावर सापळा लावला. त्यात एमएमच १२, एनबी २७६५ क्रमांकाची कार आणि एमएच २७, बीई १०४३ ही दोन्ही वाहने विशिष्ट ठिय्यावर उभी होती. एका वाहनातून दारूच्या पेट्या काढून दुसऱ्या वाहनात भरल्या जात असताना एलसीबीच्या पथकाने तिथे धडक देऊन त्यांना रंगेहात पकडले. दोन्ही वाहनाच्या चालक-मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले.