गडचिराेली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरमाेरी पाेलिसांनी मंगळवार व बुधवारला शहरासह विविध ठिकाणी धाड टाकुन दारू, दाेन दुचाकींसह एकूण २ लाख ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली. या कारवाईमुळे दारू विकेत्यांचे धाबे दणाणले आहे.
राहुल कैलास टेभुर्णे, वय ३८ वर्षे, रा. आरमोरी इंदिरानगर बर्डी याच्या राहत्या घराची झडती घेतली असता ३ नग खाकी खरड्याच्या बॉक्समध्ये देशी दारूच्या ९० मिली मापाच्या २८० नग बॉटल, त्याची विक्री किंमत ६० रुपयांप्रमाणे एकूण १६,८०० रुपयांचा माल मिळाला. तसेच बादल तुळशीदास गिरीपुंजे रा. वैरागड याच्या मालकीची एम एच -३३-२-६१९४ क्रमाकाची दुचाकी वैरागड रोडवरील पाण्याच्या टॉकीजवळ थांबवून पाहणी केली असता मोटारसायकलच्या समोरील डिकीमध्ये २ लिटर क्षमतेची विदेशी दारूची बॉटल सापडली. दारू व दुचाकी मिळून एकूण ४२,७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
मारोती यादवराव पात्रीकर व मागे बसणारा इसम लोमेश्वर बाबूराव भोयर दोन्ही रा. वासाळा यांची तपासणी केली असता मोटारसायकलवर एका प्लास्टिक चुंगळीत ५० लिटर हातभट्टी मोहादारू सापडली. दारू व दुचाकी मिळून ५० हजारांचा माल जप्त केला. याशिवाय आणखी दाेन कारवायांमध्ये दारूचा साठा पकडण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय मंडलिक यांच्या नेतृत्वात आरमाेरी पाेलिसांनी सदर कारवाई केली.