कुरखेडा (गडचिराेली) : शहरातील गोठणगाव नाक्यावर गांजा या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून वाहनाची तपासणी केली असता, वाहनात दाेन पाेत्यांमध्ये गांजा आढळून आला. गांजा व वाहन जप्त करीत पोलिसांनी दाेन आराेपींना अटक केली
मालेवाडा परीसरातून कुरखेडा मार्गे गांजाची तस्करी करण्यात येते अशी गाेपनीय माहीती कुरखेडा पोलिसांना मिळाली. मध्यरात्री मालेवाडा मार्गावरील गोठणगाव नाक्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचा मार्गदर्शनात कुरखेडा पोलिसांनी सापळा रचला होता. चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. ४६ ए. एल. ६५४५ मालेवाडा मार्गाने येत असताना वाहनावर संशय आला. वाहन थांबवून झडती घेतली असता दाेन पाेत्यांमध्ये २४ किलो ७०० ग्राम सूखा गांजा आढळला. गांजाची किंमत २ लाख ४७ हजार रुपये एवढी हाेते. साेबत ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन व २२ हजार रुपये किमतीचे दोन वापरते मोबाइल असा एकूण ६ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी वैभव नरेश धूळस (३०) व अनिरूद्ध देवानंद कांबळे (३१) दोन्ही रा सिंगोरी ता. मौदा जि. नागपुर यांना अटक केली. सदर कुरखेडा तालुक्यातून नागपूर जिल्ह्यात नेला जात हाेता.