लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गडचिराेली शहरातील पाेटेगाव बायपास ते गाेकुलनगर दरम्यानच्या मार्गावर दोन लाखांची दारू आणि चारचाकी वाहनासह एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ८ डिसेंबर राेजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास केली.जिल्हा पाेलीस अधीक्षक व अतिरिक्त पाेलीस अधीक्षकांनी अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे साेपविली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे पथक गडचिराेली शहरात गस्त घालत असताना दारूची अवैधरित्या शहरात वाहतूक हाेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर विवेकानंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पाेलिसांनी पाळत ठेवली. दरम्यान एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने संशयास्पदरित्या पाेटेगाव बायपास ते गाेकुलनगरकडे येत असल्याचे दिसले. वाहन चालकास हाताने इशारा करून वाहन थांबविण्यास सांगितले. दरम्यान चालकाने रस्त्याच्या बाजुला वाहन उभे करून अंधाराचा फायदा घेत गाेकुलनगरकडे पळ काढला.पाेलिसांनी पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी जप्त करत त्यातील दारूसाठा ताब्यात घेतला. फरार आराेपीविराेधात गडचिराेली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन व दारू मिळून एकूण ३ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देशी-विदेशी दारूसह मुद्देमाल जप्तजप्त केलेल्या मुद्देमालात ९३ हजार रुपये किमतीच्या इम्पेरिअल ब्ल्यू विस्कीच्या १८० मिलीच्या ३१० बाटल्या, ५६ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ७ पेट्या, ४८ हजार रुपयांच्या देशी दारूच्या राॅकेट संत्रा कंपनीच्या ६ पेट्या तसेच दीड लाख रुपये किमतीचे वाहन आदी मुद्देमाल होता.