लोकमत न्यूज नेटवर्कचार्मोशी/ देसाईगंज : देसाईगंज व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे पोलिसांनी सापळा रचून सुमारे दोन लाख किमतीची दारू व ८ लाख ५० हजार रूपये किमतीची दोन वाहने जप्त केली आहेत.चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा-सगणापूर मार्गावरील तुकूम फाट्याजवळ चामोर्शी पोलिसांनी ५ जुलै रोजी सापळा रचला. काही वेळातच एक चारचाकी वाहन सगणापूरवरून भेंडाळाकडे येताना दिसले. पोलीस वाहन रस्त्यावर आडवे लावून सगणापूरवरून येणारे वाहन थांबविले. या वाहनातील दोन इसम खाली उतरून पळायला लागले. त्यांचा पाठलाग केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता, सचिन अशोक लांजेवार (३१) रा. तुमखेड ता.गोरेगाव जि.गोंदिया असल्याचे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात दीड लाख रूपये किमतीची दारू आढळून आली. दारू व ४ लाख ५० हजार रूपये किमतीचे वाहन पोलिसांनी जप्त केले. सचिन लांजेवार याची चौकशी केली असता, गोलू ऊर्फ राजेंद्र सपन मंडल रा.कुनघाडा व कालू ऊर्फ रूपेश सहारे रा.गोंदिया असे पळून जाणाऱ्यांची नावे असल्याची त्यांनी सांगितले. तिघांविरोधात चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, पोलीस हवालदार नजीर पठाण, विनोद कुनघाडकर, राजू उराडे यांनी केली.देसाईगंज पोलिसांनी शहरातील तुकूम वॉर्डात वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली असता, वाहनात ३९ हजार रूपये किमतीची दारू आढळून आली. दारूसह ४ लाख रूपयांचे वाहन जप्त केले. दिलीप अशन्ना कुचनकार (३२), अजय महाफिल गजभिये (२८) दोघेही रा. आंबेडकर वॉर्ड, देसाईगंज या दोन आरोपींना अटक केली.
दोन लाख रूपयांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 11:26 PM
देसाईगंज व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे पोलिसांनी सापळा रचून सुमारे दोन लाख किमतीची दारू व ८ लाख ५० हजार रूपये किमतीची दोन वाहने जप्त केली आहेत.
ठळक मुद्देदेसाईगंज व भेंडाळा येथे कारवाई : साडेआठ लाख रूपये किमतीची दोन वाहने जप्त