लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली/धानोरा : एटापल्ली तालुक्यातील परपनगुडा व धानोरा तालुक्यातील तोडे येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या गावकऱ्यांचे स्मारक उभे केले. विशेष म्हणजे दोन्ही स्मारक लोकवर्गणी व श्रमदानातून उभे करण्यात आले आहेत.एटापल्ली तालुक्यातील परपनगुडा येथील पुसू हेडो या नागरिकाची नक्षलवाद्यांनी १५ मे २०१० रोजी हत्या केली. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा निषेध करीत पुसो हेडो यांची गावकऱ्यांनी गावातच मोठे स्मारक उभारले. यावेळी हेडो यांच्या कुटुंबियांनी नक्षलवाद्यांनी आपल्या कुटुंबातील कर्त्याव्यक्तीची हत्या करून कुटुंब उद्ध्वस्त केल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. नक्षलवाद्यांनी कसनसूर-एटापल्ली मार्गावर लावलेल्या बॅनरची होळी केली. नक्षल्यांविरोधात नागरिकांच्या मनामध्ये तीव्र रोष दिसून आला.धानोरा तालुक्यातील गोडलवाही हद्दितील तोडे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या विरोधात गावकºयांनी रॅली काढली. तसेच नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या सुरेश तोफा यांचे स्मारक बांधले. मेळाव्यादरम्यान गावकऱ्यांनी मनोगतातून नक्षलवाद्यांच्या विरोधात असलेल्या भावनांचा वाट मोकळी करून दिली. नक्षलवादी हे सतत बंद पुकारतात. त्यामुळे दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत होते. एकीकडे जंगल वाचविण्याचा संदेश नक्षल्यांकडून दिला जातो. तर दुसºया बाजुला स्वत:च्या हितासाठी झाडांची कत्तल करून सदर झाडे रस्त्यावर टाकून मार्ग अडविला जातो. दुर्गम भागातील सामान्य नागरिकांना त्रास देणे थांबवावे, आमचे स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी करू नये, नक्षलवाद्यांच्या आडकाठीमुळेच आजपर्यंत विकास रखडला आहे. स्वत:चे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी नक्षलवादी रस्ते, शाळा बांधकाम आदींना विरोध करीत आहेत, असे मनोगत व्यक्त केले. मेळाव्यादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे तसेच सीआरपीएफचे असिस्टन्ट कमांडंट धर्मराज यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला तोडे परिसरातील जवळपास ४०० नागरिक उपस्थित होते.
गावकऱ्यांनी उभारले दोन स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:52 AM
एटापल्ली तालुक्यातील परपनगुडा व धानोरा तालुक्यातील तोडे येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या गावकऱ्यांचे स्मारक उभे केले. विशेष म्हणजे दोन्ही स्मारक लोकवर्गणी व श्रमदानातून उभे करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देनक्षल्यांकडून झाली होती हत्या : तोडे व परपनगुडा येथे लोकवर्गणी व श्रमदानातून बांधकाम