गडचिरोली : एटापल्ली पोलिसांच्या नाकाबंदीत दुचाकी उभी केली, चटई पाण्यात फेकली व दोघांनी पायीच सिनेस्टाइल पळ काढला. यानंतर पोलिसांनी चटई उचलली असता त्याखाली दोन रायफल आढळल्या. त्यामुळे पोलिसही हादरुन गेले. १३ जुलै रोजी सकाळी दहा वाजता एटापल्ली-कसनसूर मार्गावर हा प्रकार घडला.
एटापल्लीचे उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रविराज कांबळे हे उपनिरीक्षक संतोष मोरे, सविता काळे व सहकाऱ्यांसमवेत १३ जुलै रोजी सकाळी कसनसूर मार्गावर नाकाबंदी करुन वाहनांची झडती घेत हाेते. यावेळी दुचाकीवरुन (एमएच ३३ डी- ५७४९) दोघे आले. पोलिसांना पाहून ते थबकले. दोघांनी दुचाकी तेथेच उभी केली. त्यांच्यासोबत असलेली चटई त्यांनी एका नाल्यात टाकली व तेथून वाऱ्याच्या वेगाने पायीच पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जंगलातून पसार झाले.
शिकारी की नक्षली 'कनेक्शन'?
दरम्यान, पोलिसांनी चटई उचलली असता त्याखाली दोन रायफल आढळल्या. या शस्त्रासह दुचाकी जप्त केली आहे. दोन्ही संशयित आरोपी नेमके कोण, रायफल जवळ बाळगण्याचा उद्देश काय, ते शिकारीवर निघाले होते की नक्षल्यांशी संबंधित होते, त्यांचा काही कट होता का, या बाबी अद्याप गुलदस्त्यात आहेत.
एटापल्लीत नाकाबंदी दरम्यान हा प्रकार घडला आहे. दोन्ही संशयित आरोपी कोण आहेत, याचा शोध सुरु आहे. ते नक्षलवादी असल्याचे पुरावे अद्याप तरी हाती आलेले नाहीत. मात्र, त्यांना लवकरच शोधून काढू. त्यानंतर सर्व उलगडा होईल.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली