रांगीतील ग्राहक त्रस्त : चौकशी करा लोकमत न्यूज नेटवर्क रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी येथील विद्युत ग्राहकांना मे, जून या दोन महिन्याचे बिल जुलै महिन्यात देण्यात येत आहे. त्यामुळे दोन महिन्यांचा भूर्दंड ग्राहकांवर एकाचवेळी पडणार आहे. वीज विभागाच्या या कारभाराविषयी ग्राहकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. संबंधित वितरकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. रांगी येथे मे महिन्याचे विद्युत बिल वाटप करण्यात आले नाही. जून महिन्याच्या बिलाबरोबर मे महिन्याचेही बिल देण्यात येत आहे. मागील महिन्यात ग्राहकांना वीज बिल मिळाले नाही. त्यामुळे अनेकांनी वीज बिलाचा भरणाच केला नाही. त्यामुळे आता दोन महिन्यांचे बिल एकाचवेळी भरावे लागणार आहे. संपूर्ण गावातील बिलांचे वितरण संबंधित वितरकाने केली नाही. याबाबतची चौकशी करून संबंधित वितरकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे किंवा वीज वितरण कंपनीची चुकी असेल तर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. रांगी परिसरात रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. बहुतांश नागरिकांनी रोवण्याच्या कामासाठी पैशाची जुळवाजुळव करून ठेवली आहे. दोन महिन्याचे बिल भरताना आता ग्राहकांची चांगलीच दमछाक उडणार आहे. यापूर्वीही अनेकदा रांगी येथे बिलांचे वाटप करण्यात आले नसल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज वितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. दोन महिन्यांचे बिल आता न भरल्यास संबंधित ग्राहकाचा वीज पुरवठा थकीत करण्याची कारवाई महावितरणकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज बिल भरण्यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी आहे.
दोन महिन्यांचे वीज बिल एकाच वेळी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 2:45 AM