लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरात नगर पंचायतींतर्गत अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, रस्त्याचे खडीकरण आदी कामे हाती घेण्यात आली. परंतु सदर कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. दोन ते तीन महिन्यातच सिमेंट रस्ते उखडले असून या कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.आरमोरी नगर पंचायतीची सत्ता २४ एप्रिल २०१५ पासून प्रशासकाच्या हाती आहे. नगर पंचायतीला प्राप्त होणाऱ्या निधीची विल्हेवाट प्रशासकांच्या माध्यमातून लावली जाते. अनेक विकास कामे शहरात केली जात आहेत. परंतु ती कामे योग्य प्रकारे होत नसून विकास कामांवरच गालबोट लागत आहे. महाराष्ट्र नगरोत्थान योजना, दलित वस्ती सुधार योजना, रस्ते अनुदान निधी, चौदावा वित्त आयोग आदी योजनांतून प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो. परंतु निधीची विल्हेवाट लावताना गरज असेल तिथे सिमेंट रस्ता व नाल्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे. मात्र नगर पंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने कोणत्या ठिकाणी रस्ते, नाल्यांचे बांधकाम करावे, याबद्दल सामंजस्याचा अभाव असल्याचे दिसून येते. प्रशासक, अधिकारी, कंत्राटदार संगनमत करून निकृष्ट दर्जाचे रस्ते शहरात बांधत आहेत.अनेक ठिकाणी अत्यल्प सिमेंट, गिट्टीचा वापर केला जात आहे. तसेच कोपिंग न करणे, खडीकरण न करताच रस्त्याचे बांधकाम करणे यासह विविध कामे शहरात सुरू आहेत. ११ आॅगस्ट २०१७ ला उमाजी डोकरे यांच्या घरापासून अरविंद तितीरमारे यांच्या घरापर्यंत बांधून तयार झालेला रस्ता महिनाभरातच उखडला. अत्यल्प सिमेंटचा वापर करून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याची दुर्दशा झाली. सदर रस्ता ७० मीटर लांब, ३.७५ मीटर रूंद आहे. ५ लाख १५ हजार रूपयांचा खर्च करून रस्त्याचे बांधकाम करायचे होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे, असा आरोप नागरिकांनी करीत या बांधकामांची चौकशी करून प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पंकज सपाटे, उमाजी डोकरे, प्रकाश श्रीरामे, अरविंद तितीरमारे, दामोधर नारनवरे, विठोबा तोरणकर यांनी केली आहे.मागणी नसतानाही बांधकामआरमोरी नगर पंचायतीने शहरातील काही भागात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम केले आहे. यातील अनेक रस्त्यांवर लोकवस्ती अतिशय विरळ आहे. विशेष म्हणजे या भागातील कोणत्याच नागरिकांनी सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची मागणी केली नाही. तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीने सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. याबाबीला नगर पंचायतीने दुजोरा दिला आहे.
दोन महिन्यातच उखडले सिमेंटचे रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:49 PM
आरमोरी शहरात नगर पंचायतींतर्गत अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, रस्त्याचे खडीकरण आदी कामे हाती घेण्यात आली. परंतु सदर कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.
ठळक मुद्देआरमोरीतील अंतर्गत रस्ते : अधिकारी, अभियंता व कंत्राटदारावर कारवाईची मागणी