सहायक अनुदान : गडचिरोली पालिकेला ३१ लाखांचा निधीगडचिरोली : राज्यभरातील नगर परिषदांचा जकात कर व महागाई भत्ता रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी शासनाने सर्व नगर परिषदांना सहायक अनुदान लागू केले आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिकांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५४ लाख २६ हजार ७९८ रूपयांचा निधी मिळणार आहे. यासंदर्भात राज्याच्या नगर विकास विभागाने २३ डिसेंबर २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्याच्या नगर विकास विभागाकडून २०१५-१६ च्या डिसेंबर महिन्याचे सहायक अनुदान म्हणून गडचिरोली पालिकेला ३१ लाख ७४ हजार १४० तर देसाईगंज नगर पालिकेला २२ लाख ५२ हजार ६५८ रूपयांचा निधी मिळणार आहे. सदर निधी वितरणास राज्याच्या नगर विकास विभागाने मान्यता प्रदान केली आहे. सहायक अनुदानाच्या रूपात मिळालेल्या लाखो रूपयांच्या निधीतून गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन होणार आहेत. ३१ आॅगस्ट २००९ च्या शासन निर्णयानुसार नगर परिषद कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे वेतनश्रेण्या लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व नगर परिषदांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता प्राप्त न झाल्यास सन २००९-१० या आर्थिक वर्षापासून सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू न केल्यास २३ डिसेंबर रोजीच्या आदेशाद्वारे देण्यात आलेले नगर पालिका सहायक अनुदान संबंधित नगर परिषदेस देय होणार नाही व ते अनुदान वसुलीस प्राप्त राहील, असेही नगर विकास विभागाने २३ डिसेंबरच्या शासन निर्णयात म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
दोन नगर पालिकांना मिळणार ५४ लाख
By admin | Published: December 27, 2015 1:42 AM