कुरखेडा : घाटी येथील दोन पाळीव जनावरे दोन दिवसांपूर्वी जंगलात चरण्याकरिता गेल्यावर बेपत्ता झाली होती. त्यांचे सांगाडे शुक्रवारी (दि. १३) जंगलात आढळून आले. जवळच बिबट्याच्या पायांचे ठसेसुद्धा दिसून आल्याने बिबट्यानेच त्या जनावरांना ठार करीत फस्त केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घाटी येथील शेतकरी भाऊराव कवाडकर यांच्या मालकीची गाय व प्रकाश ठलाल यांच्या मालकीचा गोऱ्हा मागील दोन दिवसांपूर्वी जंगलात चरण्याकरिता गेला होता. मात्र ही जनावरे परत आलीच नाहीत. शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांनी गावालगत असलेल्या जंगलात शोधमोहीम राबविली, यावेळी तिथे गाय व गोऱ्ह्याचा सांगाडा आढळून आला. घटनास्थळावर ठिकठिकाणी बिबट्याच्या पायांचे ठसे दिसत असल्याने बिबट्यानेच या जनावरांना ठार केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे प्रत्येकी १५ हजारप्रमाणे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. वनरक्षक आर. पी. पारधी यांनी घटनास्थळावर पोहोचत पंचनामा केला. यावेळी मुरलीधर कवाडकर, उपसरपंच फाल्गुन फुले, पोलीस पाटील टेकाम, उत्तम लाकडे, कुंडलिक ठलाल, प्रकाश ठलाल, भाऊराव कवाडकर व गावकरी हजर होते. वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
130821\img-20210813-wa0159.jpg
मृत जनावरांचा सागांळा