गडचिरोली : सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ९७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. विशेष म्हणजे यात दोन आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचाही समावेश आहे. नक्षल चळवळीतून बाहेर आल्यानंतरच आमच्या जीवनाला खरी सुरूवात झाली असून चळवळीतील जीवनापेक्षा बाहेरचे जीवन कितीतरी चांगले आहे, अशी भावना त्यांनी या सोहळ्यानंतर व्यक्त केली. पोलीस प्रशासन, मैत्री परिवार संस्था नागपूर, धर्मदाय आयुक्त नागपूर आणि साईभक्त साईसेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त पुढाकारानं हा अनोखा सोहळा गडचिरोलीत पार पडला. अतिशय नियोजनबद्धरित्या आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार ही जोडपी विवाहबद्ध झाली. भुमकांनी (आदिवासी पुजारी) विधिवत हा समारंभ पार पाडला. भव्य अशा शामियान्यात पोलीस उपविभागनिहाय वेगवेगळे कप्पे तयार करून जोडप्यांना बसविण्यात आलं होतं. प्रत्येक कप्प्यात मोहाच्या झाडाच्या साक्षीनं पाच दिव्यांभोवती सात फेरे घेऊन आदिवासी भाषेत मंगलाष्टकं झाली. प्रत्येक मंगलाष्टकानंतर जोडप्यांवर अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. वऱ्हाड्यांच्या जेवणापासून तर सोहळ्याचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केलं होतं. मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी व सदस्य त्यासाठी झटताना दिसत होते. या सोहळ्यानंतर गडचिरोली शहराच्या मुख्य रस्त्यावरून ३० ट्रॅक्टरमधून नवदाम्पत्याची फेरवरात काढण्यात आली.
आत्मसमर्पित नक्षली जोडपी अडकली विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 4:24 PM