खातेदारांची अडचण वाढली : जिमलगट्टा भागात एकालाही मिळाले नाही २४ हजार रुपये जिमलगट्टा : ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. या घटनेला आता जवळपास दोन महिने झाले. ६० दिवसानंतरही जिमलगट्टा येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेमधून दोन हजारापेक्षा अधिक रक्कम नागरिकांना मिळत नसल्याने नागरिक व खातेदार अडचणीत सापडले आहे. रिझर्व बँकेच्या धोरणानुसार प्रत्येक खातेदाराला आठवड्यातून किमान २४ हजार रूपये मिळायला पाहिजे, परंतु या शाखेतून अजूनपर्यंत एकाही खातेदाराला २४ हजार रूपये मिळालेले नाही. रोज दोन हजार रूपये दिले तरी आठवड्यातील सात दिवसात केवळ एका ग्राहकास १४ हजार रूपये रक्कम काढता येऊ शकते, यासाठी आठवडाभर बँकेत यावे लागते. नोटबंदीच्या ५० दिवसानंतर ३० डिसेंबरला नागरिकांना दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु जिमलगट्टा या दुर्गम परिसरात अजूनही नागरिकांना स्वत:च्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. जिमलगट्टा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही. केवळ सहकारी बँकेची शाखा असून नोटबंदीच्या दोन महिन्यानंतरही ५०० रूपयांची चलनी नोट ग्राहकापर्यंत पोहोचलेली नाही. बँकेतून केवळ दोन हजार रूपयांचीच एक नोट दिली जात आहे, बाजारात चिल्लरचा तुटवडा आहे. रिझर्व बँकेचे आदेश असतानाही ग्रामीण भागातील परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. १०० व ५०० चे चलन मिळत नसल्याने स्वत:ची रक्कम बँकेतून काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. देचलीपेठा, उमानूर, कमलापूर भागातील जनतेला २० किमी अंतरावर जिमलगट्टा येथे येऊन बँकेचे काम करून घ्यावे लागत आहे. बँकेत रक्कम संपल्यास अनेकदा रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत.
दोन हजारांच्या नोटने ग्राहक त्रस्त
By admin | Published: January 11, 2017 2:13 AM