गडचिरोली - आदिवासी विकास महामंडळाने करारानुसार भरडाईसाठी एका राईस मिलला धान भरडाईसाठी दिला असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच राईस मिलमधून धान भरडाई करण्याचा प्रकार रात्री उघडकीस आला. विशेष म्हणजे हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून करारनामा झालेल्या राईस मिलचे लेबल लावले जात होते. तहसीलदार डी.पी.सोनवणे यांच्याकडून दोन ट्रक तांदूळ जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.प्राप्त माहितीनुसार, आदिवासी विकास महामंडळाने यावर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान भरडाईसाठी शिवणी येथील लक्ष्मी राईस मिलसोबत करार केला होता. त्यानुसार सदर राईस मिलला भरडाई केलेला तांदूळ चामोर्शी डेपोला पुरवठा करायचा होता. परंतु तो माल पुरवठा करणे त्यांना शक्य नसल्याने लक्ष्मी राईस मिलचे लेबल असणाऱ्या पोत्यांमध्ये प्रत्यक्षात देसाईगंज येथील तिरुपती राईस मिलमधून तांदूळ भरला जात होता. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच तहसीलदार सोनवणे यांनी पोलिसांना घेऊन तिरुपती राईस मिलमध्ये तपासणी केली. त्यात प्रत्येकी 540 पोती असणारे दोन ट्रक तांदूळ लक्ष्मी राईस मिलच्या नावाने भरल्याचे दिसून आले. तो तांदूळ जप्त करून पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
आदिवासी विकास महामंडळाच्या तांदूळ भरडाईत गडबड, दोन ट्रक तांदूळ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 11:53 PM