उमानूर गावानजीकची घटना : चार जण गंभीर जखमी जिमलगट्टा : दोन वाहनांची समोरासमोर भिषण धडक झाल्याने दोन्ही वाहनाचे चालक जागीच ठार झाल्याची घटना अहेरी-सिरोंचा मार्गावर जिमलगट्टापासून १० किमी अंतरावर उमानूर गावानजीकच्या वळणावर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता घडली. कलाम हुसैन शेख (६२) रा. अहेरी व जागेद कटरे (५०) रा. नागपूर असे मृतक चालकाचे नावे आहेत. तर या अपघातातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अहेरी येथील अशोक मलयाजी बोमनवार यांच्या मालकीची टाटा कंपनीचे एमएच ३३ जी १०४३ क्रमांकाचे वाहन उमानूर येथे युरीयाच्या बॅग खाली करून अहेरीकडे परत जात होती. दरम्यान कुमारवाडी ट्रान्सपोर्टचे एमएच २९ टी ७७९ क्रमांकाचे वाहन किराणा सामान घेऊन सिरोंचाकडे जात होते. दरम्यान उमानूर गावानजीकच्या वळणावर या दोन वाहनाची समोरासमोर भिषण धडक झाली. यात दोन्ही वाहनांचे चालक जागीची ठार झाले. वाहनचालक कलाम हुसैन शेख हे कॅबिनमध्ये अडकले व त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातातील गंभीर जखमींमध्ये संतोष शंकर सिडाम (२२) रा. वांगेपल्ली, विशाल रायकुंटले रा. आलापल्ली, चंद्रय्या पानेम (३५) रा. वांगेपल्ली, राहूल मेश्राम (३५) यांचा सामवेश आहे. या चारही जखमींना जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरूवातीला उपचारासाठी दाखल करण्यात आला. त्यानंतर या चौघांना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. सदर अपघात एवढा भिषण होता की, दोन्ही वाहन समोरून प्रचंड क्षतिग्रस्त झाले. दोन्ही वाहनाचे चालक कॅबिनमध्ये अडकून ठार झाले. त्यांना बाहेर काढण्यासाठी कॅबिन तोडावे लागले. संतोष सिडाम याचे दोन्ही पाय तुटले असून विशाल रायकुंटले याच्या उजव्या हाताला गंभीर दुखावत झाली आहे. चंद्रय्या पानेम याच्या पायाला व चेहऱ्याला दुखापत झाली आहे. सदर अपघात मरपल्ली पोलीस मदत केंद्रांतर्गत घडला आहे. अपघातस्थळी पाहणाऱ्यांची गर्दी होती. (वार्ताहर)
दोन वाहनांची समोरासमोर धडक; दोन जागीच ठार
By admin | Published: July 23, 2016 1:53 AM