एटापल्ली (जि. गडचिरोली) : घरात लागोपाठ होणाऱ्या मृत्युसत्रास जबाबदार धरून पुजारी म्हणून काम करणाऱ्या महिलेसह पुरुषास जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बारसेवाडा येथे शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी १५ आरोपींना जेरबंद केले असून मृत महिलेच्या पतीसह मुलाचा आरोपींत समावेश आहे.
जननी देवाजी तेलामी (५२), देवू कटयी आतलामी (५७, दोघे रा. बारसेवाडा) अशी मृतकांची नावे आहेत. बारसेवाडा येथील एका महिलेचा २ वर्षांपूर्वी गर्भपात झाला. त्यानंतर महिन्यापूर्वी याच कुटुंबातील एका महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. १ मे रोजी दीड वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झाला. लागोपाठ मृत्यूने कुटुंब तर हादरलेच, पण गावालाही धक्का बसला. जननी व देवू हे दोघे जादूटोणा करत असल्याचा संशय कुटुंबास होता. यातून १ मे रोजी जननी व देवू यांना रात्री घरी जाऊन अमानुष मारहाण केली. त्यानंतर गावापासून एक किलोमीटर अंतरावरील नाल्यात नेऊन जिवंत जाळण्यात आले. यात दोघांचाही मृत्यू झाला.
मयत जननी हिचा भाऊ शाहू मोहनंदा यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जातपंचायतीत झाला मारण्याचा फैसला
या प्रकरणातील दोन्ही मृतकांना मारण्याचा फैसला १ मे रोजी जात पंचायतीत करण्यात आला, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. त्यांना अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले. जातपंचायतीत बहुतांश जण हे एकाच कुटुंबातील सदस्य होते. यात गावातील प्रतिष्ठित लोकांचा सहभाग आढळलेला नाही.