देसाईगंज : शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या वडसा वनविभागाच्या नाक्याजवळील विसोरा-एकलपूर टी-पाईंटवर कोहमारा महामार्गाने येत असलेल्या टँकरने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.
देसाईगंजवरून विसोराकडे जाण्यासाठी निघालेले विसोरा येथील तानाजी शेंद्रे (५३ वर्षे) व कुंभीटोला येथील पुंडलिक नागपूरकर (५५ वर्षे) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना उपचारासाठी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
देसाईगंज येथूून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून विसोरा येथील तानाजी शेंद्रे यांच्यासोबत पुंडलिक नागपूरकर हे दुचाकी क्रमांक एमएच-३३ पी-१३५२ ने जायला निघाले होते. कोहमारा महामार्गाने येत असलेल्या भरधाव टँकर क्रमांक-एमएच-३४, बीजी-५३५५ ने वळण घेताना त्यांना जबर धडक दिली. यात शेंद्रे यांच्या डाव्या पायाला तर नागपूरकर यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला.
(बॉक्स)
स्पीड ब्रेकरअभावी टी-पाईंट रस्ता धोकादायक
देसाईगंज-विसोरा या महामार्गाला वडसा वनविभागाच्या नाक्यालगत कोहमारा महामार्ग जोडल्या गेला आहे. दोन्ही बाजूला झुडपे असून पॉईंटवर स्पीडब्रेकर लावण्यात आला नसल्याने या मार्गाने येणाऱ्यांना वाहन दिसत नाही. त्यातून अपघात वाढत आहेत. समोरचे येणारे झुडपांमुळे नजरेत पडत नसल्याने या ठिकाणी तत्काळ स्पीडब्रेकर लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.