लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विडी बनविण्यासाठी वापरल्या जाणारी तेंदूची पाने (तेंदूपत्ता) तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. या दोन्ही घटना गडचिरोली शहरापासून 10 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या गावाजवळील जंगलात सोमवारी (दि.10) सकाळी घडल्या.
कल्पना दिलीप चुधरी (37 वर्ष) रा. महादवाडी आणि सिंधू दिवाकर मुनघाटे (63 वर्ष) रा.कुऱ्हाडी अशी मृत महिलांची नावे आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता तोडाईचा हंगाम सुरू आहे. उन्हाळ्याच्या एक ते दिड महिना चालणाऱ्या या हंगामात ग्रामीण भागातील मजुरवर्ग जंगलातून तेंदूपत्ता तोडून आणतात. संबंधित कंत्राटदारांकडून त्यांना गोळा केलेल्या तेंदूपत्त्याच्या प्रमाणात मोबदला मिळतो. पण अलीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या जंगलातील वाघ गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतरीत झाल्याने वाघांचे हल्ले वाढले आहेत.