लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गेल्या अनेक वर्षांपासून घरकूल मिळेल या आशेवर झोपडीवजा घरात राहून आपण जीवन जगत आहे. परंतु ग्राम पंचायत स्तरावरून योग्य कारवाई होत नसल्याने २०१६ मध्ये अर्ज सादर करून घरकूल मंजूर झाला नाही. घरकुलाचा लाभ न मिळाल्यास पंचायत समितीसमोर उपोषण करणार, असा इशारा कान्होली येथील मोहन देवतळे यांनी दिला आहे.शासनाच्या रमाई घरकूल योजनेचा लाभ मिळावा यासाठी ग्राम पंचायतमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेतील यादीत नाव समाविष्ट करण्यात आले. २५ जानेवारी २०१६ च्या घरकूल लाभार्थी यादीत ठरावात नमूद करण्यात आले. त्यानुसार मोहन देवतळे हे घरकूल मिळेल या आशेवर होते. मात्र बराच कालावधी उलटल्यानंतर देवतळे यांनी घरकुलासाठी ग्राम पंचायत स्तरावरून कार्यवाही काय झाली, याबाबत सचिव शालूनंदा मडावी यांना विचारणा केली. त्यांनी पंचायत समिती स्तरावर ठराव पाठविल्याची माहिती दिली. पं. स. स्तरावर चौकशी केली असता, ठराव हेतूपुरस्सर पाठविण्यात आले नसल्याची माहिती समोर आली. देवतळे यांनी ग्रा. पं. सह जिल्हा परिषद, ग्रामीण विकास यंंत्रणा यांच्याकडे निवेदन देऊन अद्यापही दखल घेण्यात आली नाही.देवतळे यांचे घर कुडामातीच्या भिंती व कौलारू छताचे आहे. मागील पावसाळ्यात त्यांच्या घराची भिंत कोसळली. यात बरेच नुकसान झाले. परंतु घरकुलाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे ग्रा. पं. सचिवांची चौकशी करून कारवाई करावी. सदर प्रश्न मार्गी न लागल्यास कुटुंबीयांसमवेत पं. स. समोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा मोहन देवतळे यांनी दिला. या संदर्भात सरपंच व संवर्ग विकास अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
दोन वर्षांपासून घरकुलाचा प्रश्न प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:34 AM
गेल्या अनेक वर्षांपासून घरकूल मिळेल या आशेवर झोपडीवजा घरात राहून आपण जीवन जगत आहे. परंतु ग्राम पंचायत स्तरावरून योग्य कारवाई होत नसल्याने २०१६ मध्ये अर्ज सादर करून घरकूल मंजूर झाला नाही.
ठळक मुद्देपत्रकार परिषद : कान्होली येथील मोहन देवतळे यांचा उपोषणाचा इशारा