गडचिराेली: आरमाेरी येथील मिनाबाजार बघून गडचिराेलीकडे जात असताना किटाळी व चुरमुरा या दाेन गावांच्या दरम्यान रस्त्यावर पडून असलेल्या झाडाच्या फांदीला भरधाव दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीवर मागे बसलेले दाेघे युवक विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेतीच्या ट्रकमध्ये सापडले. यात ते जागीच ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. सदर अपघात शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडला.
सुरज विलास मशाखेत्री (२३) रा. चंद्रपूर व मनिष नेताजी मेश्राम (१९) रा. बाळापूर तळाेधी अशी मृतकांची नावे आहेत तर तुषार मडावी(२३) रा. चंद्रपूर हा गंभीर जखमी आहे. सुरज व तुषार हे दोघेही चंद्रपूरवरून दुचाकीने तळोधी बाळापूर येथे राहणाऱ्या मनीष मेश्राम याच्या भेटीला चंद्रपूरवरून आले हाेते. आरमाेरी येथील मिनाबाजार बघीतल्यानंतर ते गडचिराेली मार्गे चंद्रपूरला जाण्यासाठी निघाले. किटाळी गावाजवळ मार्गावर झाडाची फांदी रस्त्यावर पडली होती. दुचाकी अतिशय वेगात असल्याने वेळीच दुचाकी नियंत्रित करणे शक्य झाले नाही. यात दुचाकी थेट झाडाच्या फांदीला जाऊन धडकली.
यात दुचाकीवर मागे बसलेले सुरज व मनिष हे दुचाकीवरून रस्त्यावर फेकल्या गेले. त्याचवेळी आरमाेरीकडे रेती भरलेला ट्रक जात हाेता. या ट्रकच्या चाकामध्ये सुरज व मनिष आल्याने ते जागीच ठार झाले. दुचाकी चालवत असलेला तुषार १०० मिटर फरफटत गेला. यात ताे गंभीर जखमी झाला. गावातील नागरिकांनी याबाबतची माहिती आरमाेरी पाेलिसांना दिली. पाेलिसांनी घटानस्थळ गाठून जखमी तुषारला दवाखाण्यात पाठविण्याची व्यवस्था केली. ट्रकचालक दीपक बानबले याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिल मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख करीत आहेत.