सिरोंचा तालुक्यात बहुसंख्य शेतकरी गरीब व आदिवासी आहेत. आदिवासी समाजातील शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमीन खरेदी-विक्री करता येत नाही. असे असतानाही तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तेलंगणातील अनेक आर्थिकदृष्ट्या संपन्न शेतकऱ्यांकडून शेतजमिनी भाडेतत्त्वावर घेतली जात आहे. अनेक सावकारांनी या कामाचा सपाटा लावला आहे.
शेतजमिनीतून उत्पादित होणारा माल तेलंगणा व आंध्र प्रदेशात नेऊन विक्री केला जात आहे. काही ठिकाणी कापूस तर काही ठिकाणी धानाची लागवड तेलंगणातील शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, तेलंगणातील अनेक सावकार सिरोंचात स्थायिक झाले आहेत. भाडेतत्त्वावर जमीन घेऊन त्यातून भरघोस उत्पादन काढणे व त्यातूनच येथे जमिनी खरेदी करणे हा प्रकार दिसून येत आहे. तेलंगणातील अनेक सावकार सिरोंचा येथे भाडेतत्त्वावर जमिनी घेऊन भूमिस्वामी बनल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.