सक्रिय काेराेनाबाधितांची संख्या चार हजारपेक्षा अधिक झाली आहे. यातील ८० टक्के रुग्णांना काेराेनाची अगदी सामान्य लक्षणे आहेत. या रुग्णांना रुग्णालयात भरती करून गर्दी करण्यापेक्षा त्यांना जवळच्या काेविड केअर सेंटरवर ठेवले जात आहे. यासाठी प्रशासनाने बहुतांश ठिकाणची वसतिगृहे ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उपचार घेण्याची व्यवस्था केली आहे.
एप्रिल महिन्यांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. बहुतांश इमारती स्लॅबच्या आहेत. उन्हामुळे स्लॅब तापून खाेलीत राहणे कठीण हाेते. अशा वेळी कुलरशिवाय पर्याय नाही. मात्र बहुतांश इमारतींमध्ये प्रशासनाने कुलरची व्यवस्था केली नाही. परिणामी रुग्णांना उकाड्यातच राहावे लागत आहे. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काेराेनाबाधितांवर उपचारासाठी शासन काेट्यवधी रुपये खर्च करीत आहे. अशा स्थितीत कुलरची व्यवस्था करण्यात काहीच अडचण नाही. काेराेनापेक्षा उकाड्याचाच त्रास अधिक हाेत आहे, अशी प्रतिक्रिया काही काेराेनाबाधितांनी व्यक्त केली आहे.
काही तालुक्यांमध्ये विजेची समस्या गंभीर आहे. एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कित्येक तास वीजपुरवठा सुरळीत हाेत नाही. अशा स्थितीत पंखेही बंद राहतात व काेविड केअर सेेंटरमध्ये अंधार पसरलेला राहतो. यावेळी रात्र काढणे कठीण हाेत आहे.
बाॅक्स
मे व जून हाेणार कठीण
दिवसेंदिवस तापमानात वाढच हाेणार आहे. मे व जून महिन्यात तर तापमान ४४ अंश सेल्सिअसच्यावर राहते. आता तापमान ४० अंश सेल्सिअस असताना काेविड केअर सेंटरमध्ये राहणे कठीण हाेत आहे. मे व जून महिन्यात तर तापमानात पुन्हा वाढ हाेणार आहे. या महिन्यांमध्ये काेविड केअर सेंटरमध्ये राहणेच कठीण हाेणार आहे.
तब्येत बिघडण्याचा धाेका
काेराेनाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत राहण्याच्या ठिकाणी प्रचंड गर्मी असल्याने रात्री व दिवसाही झाेप लागत नाही. झाेप न झाल्यामुळे तब्येत बिघडण्याचा धाेका आहे. तसेच उष्माघातही हाेण्याची भीती आहे.
काेट
पर्याय नसल्याने राहावे लागते
उकाड्यामुळे काेविड केअर सेंटरमध्ये राहणे कठीण झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने येथे राहावे लागत आहे. काेराेनाच्या प्रतिबंधासाठी शासन काेट्यवधी रुपये खर्च करीत आहे. उन्हाळ्यातील उकाडा लक्षात घेता प्रत्येक केंद्रावर कुलरची व्यवस्था असणे आवश्यक आहे. अन्यथा काेराेनापेक्षा उकाड्यानेच नागरिकांची तब्येत बिघडण्याचा धाेका आहे.
- काेराेनाबाधित रूग्ण
बाॅक्स ....
एकूण काेविड केअर सेंटर - १०
उपचार घेणारे रुग्ण - १०२४