आलापल्ली: अहेरी शहरात व तालुक्यात अनधिकृत प्रयोगशाळा व क्लिनिकल लेबॉरेटरींची तपासणी करून महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषदेचा मूळ प्रमाणपत्र याची सखोल चौकशीची करण्यासाठी तालुक्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत आहे. अनधिकृत क्लिनिकल लेबॉरेटरीजधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
प्रबंधक महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद मुंबई यांनी १० मे २०२१ ला अनधिकृत क्लिनिकल लेबॉरटरी व पॅरा वैद्यक व्यावसायिक यांच्याकडे महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषदेचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसणांऱ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना कळविले आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी १७ मे २०२१ ला जिल्ह्यातील संपूर्ण तहसीलदार यांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
त्यानुसार अहेरीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी ओंकार ओतारी यांनी अनधिकृत प्रयोगशाळा व क्लिनिकल लेबॉरटरी यांच्यावर कारवाई संदर्भात चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेशित केले आहे. आदेशान्वये समितीचे अध्यक्ष तहसीलदार स्वत: असून सदस्य म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पोलीस स्टेशन अहेरीचे पोलीस निरीक्षक यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
गठीत झालेल्या समितीमधील अधिकारी हे अहेरी शहरात व तालुक्यातील वैद्यकीय प्रयोगशाळा व सर्व क्लिनिकल लेबॉरेटरी यांची तपासणी करून महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषदचा रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसणाऱ्यांवर महाराष्ट्र पॅरा वैद्यक अधिनियम २०११ च्या कलम ३१ व ३२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. अनाधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.